नवी दिल्ली : ‘दोन वर्षांचा असताना टीव्हीवर पहिल्यांदा फीफा विश्वचषक सामना पाहिला. त्यावेळी, हॉलंडविरुद्ध रोमेरिओने केलेला शानदार गोलने मला वेड लावले. त्या गोलनंतर मी फुटबॉलसाठी अगदी वेडा झालो आणि तेव्हापासून माझे विश्वचषक स्पर्धा खेळण्याचे स्वप्न बनले,’ अशी आठवण ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार याने फीफाच्या अधिकृत संकेतस्थळावर सांगितली.नेमारने म्हटले की, ‘विश्वचषक स्पर्धेशी निगडीत माझी पहिली आठवण १९९४ सालची आहे, तेव्हा मी केवळ २ वर्षांचा होतो. मी तेव्हा पहिल्यांदाच टीव्हीवर विश्वचषक सामना टीव्हीवर पाहिला आणि त्यावेळी रोमेरिओने हॉलंडविरुद्ध केलेला गोल अजूनही आठवणीत आहे. बबेटोने केलेला क्रॉस रोमेरिओनेने घेतला आणि अप्रतिम गोल केला होता.’ यंदा रशियात होणाऱ्या फीफा विश्वचषक थराराला सुरु होण्यास केवळ १५ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. यानिमित्ताने अनेक दिग्गजांनी विश्वचषक स्पर्धेविषयी असलेल्या आपल्या पहिल्या आठवणींना उजाळा दिला.फ्रान्सचा दिग्गज आणि आता बेल्जियमचा प्रशिक्षक असलेला थिएरी हेन्री यानेही आपल्या पहिल्या आठवणीला उजाळा देताना म्हटले की, ‘मला विश्वचषक स्पर्धेची पहिली आठवण म्हणून १९९२ सालचा उपांत्य फेरीचा सामना लक्षात आहे. त्यावेळी मॉरियस टेÑसरने पश्चिम जर्मनीविरुद्ध गोल केला होता. मला केवळ इतकंच आठवतंय की, त्यावेळी माझ्या घरात सर्वजण आनंदाने नाचत होते. टेÑसर वेस्ट इंडिजचे होते व तेव्हा मी सुट्टीसाठी वेस्ट इंडिजला गेलो होतो. मी तेव्हा ५ वर्षांचा होतो आणि प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, त्यावेळी सर्वजण उत्साहाने नाचत होते व ओरडत होते.’फ्रान्सचा मध्यरक्षक पॉल पोग्बा याने १९९८ सालच्या विश्वचषक अंतिम सामन्याच्या आठवणीला उजाळा दिल्या. फ्रान्सने ब्राझीलला ३-० असा धक्का दिला होता. त्यावेळी केवळ ६ वर्षांचा असलेल्या पोग्बानेही आनंद व्यक्त करताना इतरांसह कारच्या छतावर चढून जल्लोष केला होता. याविषयी पोग्बाने म्हटले की, ‘मी तेव्हा खूपच लहान होतो आणि घरातील अन्य सदस्यांसह सामना पाहत होतो. फ्रान्स ज्या क्षणी विजयी झाला, तेव्हाच मी बाहेर आलो आणि कारच्या वर चढलो. त्यावेळी लोक कारचे हॉर्न वाजवून जल्लोष करत होते. सर्वजण खूश होते.’स्पेनचा मध्यरक्षक थिएगो अलकांट्रा याचे वडील माजिन्हो १९९४ सालच्या विश्वचषक विजेत्या ब्राझील संघाचे सदस्य होते. अलकांट्रा म्हणाला, ‘मला १९९४ सालचा विश्वचषक आठवतो, जेव्हा माझ्या वडिलांनी ब्राझीलसाठी कप जिंकला होता. त्यावेळी मी केवळ ३ वर्षांचा होता. मला सामन्यांची फारशी आठवण नाही, पण ज्यावेळी माझे वडिल मायदेशी परतलेले, त्यावेळी झालेला जल्लोष चांगला लक्षात आहे. तेव्हा सर्व खेळाडूंच्या कुटुंबाने सहभाग घेतला होता.’मला २००२ चा विश्वचषक आणि रोनाल्डिन्होने उपांत्यपूर्व सामन्यात इंग्लंडविरुद्ध टॉप कॉर्नरवरुन फ्री किकवर केलेला गोल लक्षात आहे. मला अजूनही ती किक चांगली आठवते. ही माझी विश्वचषक स्पर्धेशी जुळलेली पहिली आठवण आहे आणि यानंतर मी एक दिवस या स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न बाळगले.- हॅरी केन, स्ट्राइकर - इंग्लंड
दोन वर्षांचा असताना फुटबॉलने वेड लावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 2:55 AM