नवी दिल्ली : पहिल्या सामन्यात अभूतपूर्व उत्साहाने प्रभावित करणाºया युवा भारतीय संघाला दुसºया सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला. कोलंबियाने हा सामना २-१ ने जिंकला; मात्र १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील या पराभवानंतरही भारताने इतिहास रचला. या सामन्यात गोल नोंदवणारा मध्यरक्षक जॅक्सन हा फिफाच्या स्पर्धेत गोल नोंदवणारा पहिला भारतीय ठरला. या गोलमुळे जॅकसनचे नाव भारतीय फुटबॉल इतिहासात कायम स्मरणात राहील. त्याने ८२व्या मिनिटाला ही कमाल केली. कोलंबियाकडून जुआन पेनालोजा याने ४९व्या आणि ८३व्या मिनिटाला गोल नोंदवले.यजमान संघापुढे कोलंबियाच्या धाडधिप्पाड खेळाडूंचे आव्हान होते. त्यांनी आव्हान देण्याचे पूर्ण प्रयत्न केले; मात्र अनुभवाची कमतरता दिसून आली. चेंडू सर्वाधिक वेळ कोलंबियाच्या ताब्यात होता. अमेरिकेविरुद्ध आत्मविश्वासी खेळ केल्यानंतर, भारतीय संघाचे मनोबल उंचावलेले होते. कोलंबियाविरुद्ध संघ सर्वाेत्तम कामगिरी करेल असे वाटत होते. या सामन्यात भारतीय प्रशिक्षक मातोस हे खेळाडूंना जोरजोराने इशारे करीत होते.भारतीय गोलरक्षक धीरज मोइरांगथेम याने आज शानदारपणे बचाव केला. त्याला प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून वेळोवेळी दाद दिली. १६व्या मिनिटाला भारताने सुवर्णसंधी दवडली. अभिजित सरकारला गोल नोंदवण्यात अपयश आले. इन्जुरी वेळेत बचावपटू बोरिस थांगजाम याच्या प्रयत्नामुळे चेंडू राहुल कनौलीकडे पोहोचला. यावर त्याने लांब फटका मारला. परंतु, चेंडू क्रॉस बारला लागून बाहेर गेला. दुसºया सत्रात कोलंबियाने आक्रमक खेळ केला. सुरुवातीलाच म्हणजे ४९व्या मिनिटाला जुआन पेनालोजा याने लांब फटका मारत कोलंबियाला आघाडी मिळवून दिली. भारतीय बचावपटू संजीव स्टॅलीन हा त्याच्यापुढे उभाच होता, तर धीरजला चेंडू रोखण्याची संधीच नव्हती.६६व्या मिनिटाला अभिजित सरकारच्या जागी अनिकेत जाधव मैदानात उतरला. अनिकेत जाधवने येताच संधी मिळवली होती; मात्र त्याचा फटका सरळ गोलरक्षकाच्या हातात विसावला. ८२व्या मिनिटाला भारताने ऐतिहासिक गोल नोंदवला. अनिकेतने कॉर्नर मिळवला, ज्यावर संजीव स्टॅलीनने चेंडू जॅक्सनकडे सोपविला. यावर जॅक्सनने शानदार गोल नोंदवला. या बरोबरीचा आनंद भारताला अधिक वेळ साजरा करता आला नाही. पुढच्या मिनिटालाच कोलंबियाच्या पेनालोजाने गोल नोंदवला.अमेरिका बाद फेरीतनवी दिल्ली : बदली खेळाडू अयो अकिनोला याने नोंदवलेल्या गोलच्या बळावर अमेरिका संघाने घानाचा पराभव केला. याबरोबरच त्यांनी १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. सामन्यात केवळ एकमेव गोल नोंदवण्यात आला. अमेरिका संघाने घाना संघाचा १-० गोलने पराभव केला होता.
विश्वचषक फुटबॉल : भारताचा दुसरा पराभव पण जॅकसनने पहिला गोल नोंदवून रचला इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 1:39 AM