कोलकाता : फिफा १७ वर्षांखालील विश्वचषकाचे भारतात यशस्वी आयोजन झाल्याचे कौतुक करीत जागतिक फुटबॉल महासंघाचे प्रमुख जियानी इन्फन्टिनो यांनी २० वर्षांखालील विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल दावेदारी सादर करण्यासाठी भरवसा देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.येथे झालेल्या फिफा कौन्सिल बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना इन्फन्टिनो म्हणाले, ‘भारतात फुटबॉल लोकप्रिय होत आहे. विश्वचषकाच्या यशस्वी आयोजनामुळे निर्माण झालेले वातावरण टिकविण्यासाठी फिफा भारताला सर्वतोपरी सहकार्य करेल.’ भारतात विश्वचषकाच्या आयोजनास उदंड प्रतिसाद लाभला. भारतीय प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल फिफा आभारी आहे. विश्वचषक सामने पहिल्यानंतर आपण योग्य देशाला ही स्पर्धा दिल्याचा आनंद झाला.भारताने यापुढे अंडर-२० आयोजनाची दावेदारी सादर केल्यास ती विचारात घेतली जाईल का, असा सवाल करताच इन्फेन्टिनो म्हणाले, ‘याची खात्री मी देऊ शकणार नाही. यंदा दोन विश्वचषक स्पर्धा आशियात झाले. द. कोरियाने २० वर्षांखालील आणि भारताने १७ वर्षांखालील विश्वचषक यशस्वी केला. २०१९ चा २० वर्षांखालील विश्वचषक आयोजित करण्यासाठी अनेक राष्टÑांनी दावेदारी सादर केली आहे. फिफा प्रशासन सर्व बाबींचा विचार करून फिफा कौन्सिलकडे अहवाल सादर करेल. त्यानंतरच आयोजन कुठे होईल, याचा निर्णय घेतला जाईल.’अ. भा. फुटबॉल महासंघाने दावेदारी सादर केली असली तरी यापुढे मोठ्या स्पर्धेचा विचार करायला हवा. भारतात वाढलेली फुटबॉलची लोकप्रियता आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न व्हावेत. भारतीय संघाचे सामने देखील मी पाहिले आहेत. भारतीय खेळाडू आणि विदेशी खेळाडू यांच्यातील खेळात मोठी तफावत आहे. ही तफावत दूर करण्यासाठी यजमान संघाने आणखी मजल गाठण्यासाठी कठोर परिश्रम करावेत, असा सल्ला देखील फिफा प्रमुखांनी दिला. (वृत्तसंस्था)
फिफा १७ वर्षांखालील विश्वचषकाचे भारतात यशस्वी आयोजन- जियानी इन्फन्टिनो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 4:20 AM