- सचिन कोरडे गोवा : देशात पहिल्यांदाच होणाऱ्या फिफा विश्वचषक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेचा काउंटडाऊन सुरू झाला आहे. या स्पर्धेसाठी आता अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे भारताची ‘यंग इंडिया’ही तयारीला लागली आहे. या तयारीचा एक भाग म्हणून संघ नवनियुक्त प्रशिक्षक लुईस नॉर्टन द मातोस यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरू येथे १६ आॅगस्टपासून खास शिबिर आयोजिण्यात आले आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात यंग इंडिया गोव्यात सराव सुरू करेल, असे सूत्रांनी सांगितले.फुटबॉलच्या महासंग्रामाला आॅक्टोबरपासून सुरुवात होईल. भारत या स्पर्धेचा यजमान असल्यामुळे ही स्पर्धा भारतीयांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. भारतीय संघ कुठेही कमी पडू नये, म्हणून विविध प्रकारच्या योजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय संघाने नुकताच मेक्सिकोचा दौरा केला होता. हा दौरा संमिश्र यश देणारा ठरला. चार देशांच्या संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारतासह कोलंबिया, चिली, मेक्सिकोचा समावेश होता. स्पर्धेत यंग इंडियाला मेक्सिकोकडून ५-१ ने, कोलंबियाकडून ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. चिलीविरुद्ध भारताने १-१ ने बरोबरी साधली होती. तीच समाधानाची बाब ठरली. त्यामुळे विश्वचषकात भारतापुढे आव्हान असेल, हे स्पष्ट आहे.दरम्यान, भारतीय संघ ज्या गटात आहे त्या गटात कोलंबिया, अमेरिका आणि घाना या संघांचा समावेश आहे. भारताचा शुभारंभीचा सामना दिल्ली येथे ६ आॅक्टोबर रोजी अमेरिकाविरुद्ध होणार आहे.मातोस यांची गोव्याला पसंती...बंगळुरू येथे सराव शिबिर आटोपल्यानंतर ‘यंग इंडिया’ सप्टेंबर महिन्यात सरळ गोव्यात येईल. फुटबॉलचे वातावरण आणि साधन-सुविधा याचा विचार करता पोर्तुगीज प्रशिक्षक मातोस यांनी गोव्याला पसंती दिली. फातोर्डा किंवा टिळक स्टेडियमवर हा संघ सराव करेल. फिटनेस, तंत्र, कौशल्य आणि क्षमता यावर अधिक भर देण्यात येईल. येथील सरावानंतर सप्टेंबरच्या शेवटच्य आठवड्यात भारतीय संघ दिल्लीला रवाना होईल. तेथे संघ ग्रुप सामने खेळणार आहे.मातोस यांच्याकडून आशा : १६ वर्षांखालील एएफसी चषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेले निकोल अॅडम्स यांची हकालपट्टी झाल्यानंतर पोर्तुगीज प्रशिक्षक मातोस यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय फुटबॉल महासंघासोबतचा त्यांचा वाद चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे भारतीय संघाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. अखेर एआयएफएफने तातडीने मातोस यांची निवड केली.
यंग इंडिया बंगळुुरूमध्ये १६ आॅगस्टपासून करणार सराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 1:52 AM