सिरोंचा शहरात : नगरपंचायतीतर्फे विविध वॉर्डात रस्ता, नाली बांधकामे मंजूर सिरोंचा : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा नगर पंचायतीतर्फे तब्बल १ कोटी ९० लाख रूपयांची कामे विविध वॉर्डात मंजूर करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे रस्ते, नाली व इतर बांधकाम एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच सिरोंचा नगर पंचायतीच्या हद्दीत मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे सिरोंचा शहराच्या विकासाला आता गती मिळणार आहे. सिरोंचा नगर पंचायतीतर्फे वॉर्ड क्र. ५ मध्ये ९ लाख ८३ हजार ३९५ रूपये किंमतीतून सिमेंट काँक्रिट रस्ता, वॉर्ड क्र. १५ मध्ये ९ लाख ८६ हजार ४३६ रूपये किंमतीतून ११३ मीटरचा सिमेंट काँक्रिट रस्ता, वॉर्ड क्र. १६ मध्ये ९ लाख ८२ हजार रूपयातून दोन्ही बाजूचे नाली बांधकाम, वॉर्ड क्र. १६ मध्ये ९ लाख ८४ हजार रूपये किंमतीतून सिमेंट काँक्रिट रस्ता, वॉर्ड क्र. ६ मध्ये ९ लाख ८३ हजार रूपये किंमतीतून दोन्ही बाजूचे नाली बांधकाम, वॉर्ड क्र. ७ मध्ये ९ लाख ८४ हजार रूपये किंमतीतून सिमेंट रस्ता, वॉर्ड क्र. ९ मध्ये ४ लाख ७० हजार रूपये किंमतीतून नाली बांधकाम, याच वॉर्डात ९ लाख ८६ हजार किंमतीतून सिमेंट रस्ता, वॉर्ड क्र. १४ मध्ये ९ लाख ८३ हजार रूपये किंमतीतून नाली बांधकाम तसेच याच वॉर्डात ९ लाख ८६ हजार रूपये किंमतीतून सिमेंट काँक्रिट रस्ता आदी कामे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच वॉर्ड क्र. १६ मध्ये सिमेंट काँक्रिट, नाली बांधकाम लाखो रूपयातून होणार आहे. वॉर्ड क्र. १५ मध्ये वामनराव ओलल्ला यांच्या घरापासून आसरअल्लीच्या मुख्य रस्त्यापर्यंत ९ लाख ८४ हजार रूपये किंमतीतून नाली बांधकाम, वॉर्ड क्र. ९ मध्ये ९ लाख ८३ हजार किंमतीतून नाली बांधकाम तसेच याच वॉर्डात ९ लाख ८६ हजार रूपये किंमतीतून सिमेंट काँक्रिट रस्ता आणि याच वॉर्डात एका ठिकाणी दोन्ही बाजुला नालीचे बांधकाम व ११३ मीटर लांबीच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम होणार आहे. शासनाने जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतींना १ मे २०१५ रोजी नगर पंचायतीचा दर्जा दिला. दीड ते पावणे दोन वर्षांचा कालावधी होऊनही अद्याप कोणत्याच नगर पंचायतीत पाहिजे त्या प्रमाणात विकास कामांना सुरुवात झाली नाही. मात्र सिरोंचा नगर पंचायतीने विकास कामांना प्राधान्य देऊन सात वॉर्डात रस्ते, नाली बांधकाम आदींचे भूमिपूजन आटोपले आहे. सध्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येत आहे. येत्या दोन वर्षात शहरात अनेक विकास कामे मार्गी लागणार आहेत. (शहर प्रतिनिधी)
१ कोटी ९० लाखांची कामे होणार
By admin | Published: March 25, 2017 2:21 AM