चामाेर्शी : राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या चामोर्शी तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला. २० जानेवारीला ६९ ग्रामपंचायतींच्या ६०३ सदस्यांच्या जागेकरिता मतदान होणार आहे. त्यामध्ये ३३६ जागा विविध संवर्गातील महिलांकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला सदस्यांची संख्या जास्त असल्याने अनेक नवख्या महिलांची एन्ट्री ग्रामपंचायतीमध्ये होणार आहे.
चामोर्शी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मागील मार्च महिन्यात निवडणुका होणार होत्या. अनेक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रही भरले होते. मात्र, कोरोनामुळे मार्च महिन्यात स्थगित झालेल्या निवडणुका आता २०जानेवारीला होत आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये काही ठिकाणी जुनेच इच्छुक उमेदवार निवडणुकीत उतरणार असल्याचे चिन्ह दिसत आहे, तर अनेक ठिकाणी नवीन पुरुष व महिला निवडणुकीत उतरल्या आहेत.
चामोर्शी तालुक्यात एकूण ६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता प्रशासन सज्ज झाले आहे. एकूण २२० मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. एकूण १ लाख १० हजार ३८३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ५३ हजार २५३ महिला, तर ५७ हजार १३० पुरुष मतदार आहेत. पुरुष व महिला मतदारांची संख्या जवळपास सरासरी सारखीच असल्यासारखी आहे. एकूण ६०३ सदस्यांची निवड करावयाची आहे. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील ४७ सदस्य राहणार आहेत. त्यातील २० जागा महिलांसाठी राखीव आहेत, अनुसूचित जमाती प्रवर्गातील १६० सदस्यांची निवड करावयाची असून यामध्ये ९१ जागा महिलांसाठी राखीव आहेत. नामाप्र प्रवर्गामधून १३१ सदस्यांची निवड करावयाची आहे. यापैकी ७१ जागा महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी २६४ सदस्यांची निवड करावयाची असून त्यापैकी १५४ जागा महिलांसाठी राखीव आहेत. ग्रामविकासाचा महत्त्वाचा कणा म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. स्थानिक पातळीवर इतर निवडणुकीच्या तुलनेत जास्त महत्त्व ग्रामपंचायत निवडणुकीला आहे. त्यामुळे खरे राजकारण ग्रामपंचायत निवडणुकीत शिजत असते. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पॅनलनुसार निवडणुका लढविल्या जात असून अनेक पॅनल हे प्रमुख राजकीय पक्षांचे आहेत. अनेक ठिकाणी दोन ते तीन पॅनल आहेत. त्यामुळे निवडणुकीची रंगत वाढणार आहे.
बाॅक्स
अनेक ठिकाणी महिलाराज
निवडणूक होत असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये पुरुष सदस्य संख्येपेक्षा महिलांची संख्या एकने अधिक आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत महिला सदस्यांची संख्या जास्त असल्याने ग्रामपंचायतचे राजकारण महिलांभोवती फिरणार आहे. अनेक महिलांचा गावाच्या विकासात सहभाग वाढणार आहे. त्यामुळे गावाच्या विकासाची कमान सांभाळण्याची संधी महिलांच्या हाती येणार आहे. काही ग्रामपंचायतींची बिनविरोध निवडून येण्यासाठी वाटचाल सुरू आहे.