दोन आरोपी फरार : गडचिरोली पोलिसांची कारवाईगडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी स्थानिक कॅम्प एरियातील शहीद उरकुडे चौकात शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान धाड टाकून १ लाख ६५ हजार रूपयांची दारू व ६ लाख ५० हजार रूपयांची कार असा एकूण ८ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील दोन्ही आरोपी फरार आहेत. हेमंत ढोक व सुमन मरपल्लीवार अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक इंदिरा गांधी चौकातून एमएच-३३-ए-४६४३ क्रमांकाच्या कारने दारू आणली जात असल्याची गुप्त माहिती गडचिरोली पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे व गडचिरोलीचे ठाणेदार विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनात इंदिरा गांधी चौकात सापळा रचण्यात आला. नाकेबंदी करून वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनधारकाने वाहन उभे ठेवले नाही. त्यामुळे सदर वाहनाचा पाठलाग केला असता, आरोपींनी वाहन शहीद वीर उरकुडे चौकात ठेवून पसार झाले. त्यानंतर वाहन पोलीस ठाण्यात आणून पाहणी केली असता, त्यामध्ये देशी दारूच्या ३३ पेट्या आढळून आल्या. त्यांची किंमत १ लाख ६५ हजार रूपये एवढी आहे. त्याचबरोबर ६ लाख ५० हजार रूपये किंमतीचे वाहन जप्त केले आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे व ठाणेदार विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनात एपीआय नायकवाडे, दीपक डोंगरे, विजय राऊत, मुरलीधर दोनाडकर, एस. सी. घोडाम, किरण बोरकुटे यांनी केली आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची संपूर्ण जिल्हाभरात अवैध दारूविक्रेत्यांवर करडी नजर आहे. अनेक ठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)
१ लाख ६५ हजारांची दारू जप्त
By admin | Published: October 18, 2015 1:37 AM