गडचिरोली प्रकल्प : आदिवासी विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणाची संधीगडचिरोेली : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देऊन शिक्षण देण्याची योजना आदिवासी विकास विभागामार्फत राबविली जाते. या योजनेंतर्गत गडचिरोलीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने यंदा सन २०१६-१७ च्या शैक्षणिक सत्रात जुने ६७० व नवीन ४२७ अशा एकूण १ हजार ९७ आदिवासी विद्यार्थ्यांचे इयत्ता पहिली व पाचवीत प्रवेश पूर्ण केले आहे. सन २००३ पासून राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत महाराष्ट्रातील जवळपास २५ आदिवासी प्रकल्पाअंतर्गत मिळून एकूण २ हजार ५०० विद्यार्थ्यांना मोठ्या शहरातील नामांकित निवासी शाळेत प्रवेश देऊन त्यांच्या शिक्षणाची व निवासाची संपूर्ण सोय केल्या जात होती. मात्र त्यावेळी या योजनेचे स्वरूप अतिशय मर्यादित होते. त्यानंतर राज्य शासनाने या योजनेला व्यापक स्वरूप देत संपूर्ण महाराष्ट्रात नामांकित शाळेत प्रवेशीत विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट १० पटीने वाढविले. २ हजार ५०० वरून विद्यार्थी प्रवेशाचे उद्दिष्ट सुमारे २५ हजार संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रात २५ आदिवासी प्रकल्पांना प्रत्येकी १ हजार विद्यार्थी प्रवेशाचे उद्दिष्ट या योजनेंतर्गत देण्यात आले. यासंदर्भात राज्याच्या आदिवासी विकास विभागाने २१ एप्रिल २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित केला. या योजनेची अंमलबजावणी गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत केली जात आहे. गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबतचे नियोजन शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला केले. शासकीय आश्रमशाळांकडून प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांचे दाखले घेणे, त्यांच्याकरिता शहरातील नामांकित शाळांची पडताळणी करणे, निवड करणे, निवास, भोजन व इतर सोयीसुविधा करणे आदी जबाबदारी पार पाडली. त्यानुसार यावर्षी प्रकल्प कार्यालयामार्फत शहरातील इंग्रजी माध्यमांच्या तब्बल १२ नामांकित शाळांची निवड करण्यात आली. यामध्ये १ हजार ९७ आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. यामध्ये ४२७ नवीन व ६७० गतवर्षी प्रवेशित जुन्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गडचिरोली प्रकल्प कार्यालयाला निकषात बसणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळा पुरेशा प्रमाणात मिळाल्या नाहीत. प्रस्तावित अनेक नामांकित शाळांनी निकष पूर्ण केले नाही. त्यामुळे आदिवासी विभागाने गडचिरोली प्रकल्प कार्यालयाला यंदा ६२७ विद्यार्थी प्रवेशाचे उद्दिष्ट दिले व सदर उद्दिष्ट प्रकल्प कार्यालयाने १०० टक्के गाठले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
१ हजार ९७ विद्यार्थ्यांचे नामांकित शाळेत प्रवेश
By admin | Published: October 22, 2016 2:02 AM