गडचिरोली : जानेवारी ते २२ मे पर्यंत गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठ सापळे रचले असून यामध्ये १० आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ लाख १९ हजार ५०० रूपयाची रोकड जप्त करण्यात आली आहे. लाचखोरीला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र भ्रष्टाचाराविषयी नागरिकांनामध्ये फारशी जागृकता नसल्याने नागरिक भ्रष्टाचाराच्या तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करीत नव्हते. मात्र मागील काही दिवसापासून नागरिकांमध्ये जागृकता आल्याने तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. त्यावरून सापळे रचले जात आहेत. गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने २०१० साली ८ सापळे रचले होते. यामध्ये ८ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून २५ हजार रूपयाची रोकड जप्त करण्यात आली होती. २०११ मध्ये १० सापळे रचण्यात आले. यापैकी ३ सापळे चंद्रपूर जिल्ह्यात रचण्यात आले. १२ आरोपींना अटक करण्यात आली. त्यावर्षी ४८ हजार ४०० रूपयाची रोकड जप्त करण्यात आली. २०१२ मध्ये गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे काम अत्यंत ढिम्म झाले. २०१२ मध्ये केवळ २ सापळे रचण्यात आले. त्यात ३ आरोपींना अटक करून १५ हजार ५०० रूपयाची रोकड जप्त करण्यात आली. २०१३ मध्ये ७ सापळे रचून ८ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ९ हजार ५०० रूपयाची रोकड जप्त करण्यात आली. २०१४ मध्ये केवळ ५ महिन्यात ८ सापळे रचण्यात आले. त्यामध्ये १० आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल १४ लाख १९ हजार ५०० रूपयाची रोकड जप्त करण्यात आली. यामध्ये एक सापळा चंद्रपूर येथील पथकासोबत व दुसरा सापळा नागपूर येथील पथकासोबत रचण्यात आला. काही वर्षातील आकडेवारीकडे नजर टाकल्यास एसीबीच्या कारवाईत चढता आलेख दिसतो. (नगर प्रतिनिधी)
५ महिन्यांत १० लाचखोर गजाआड
By admin | Published: May 23, 2014 11:52 PM