गडचिरोली : ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या दृष्टीकोणातून शासनाने तालुकास्तरावर ग्रामीण रूग्णालय तर तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र तर काही गावात आरोग्य उपकेंद्राची स्थापना केली आहे. मात्र आरोग्य सेवेचा उद्देशाला हरताळ फासल्या जात आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ते रूग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. जिल्ह्यात सध्यास्थितीत जवळपास १०० च्यावर बोगस डॉक्टरांची संख्या आहे. मात्र कारवाई करण्यास प्रशासन उदासीन असल्याचे दिसते. ग्रामीण व दुर्गम भागातील रूग्णालयात औषधांचा तुडवडा ही नित्याचीच बाब झाली आहे. अपुरे कर्मचारी तसेच अत्याधुनिक सोयी-सुविधाही नाही. अशीच स्थिती प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राची आहे. बऱ्याच उपकेंद्रातील परिचारिकाही वेळेवर हजर राहत नाही. त्यामुळे त्या परिसरातील रूग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते. परिणामी ग्रामीण भागातील रूग्णांना खिशाला कात्री लावत खासगी रूग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्यात ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच अनेक गावात उपकेंद्र आहेत. मात्र या सर्वच रूग्णालयामध्ये अनेक समस्या कायम आहेत. रिक्त पदांमुळे शासकीय आरोग्य सेवा पूर्णत: ढासळली आहे. याच संधीचा फायदा घेत जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे. मेडिकल कॉन्सीलचे प्रमाणपत्र नसतांनाही जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्रासपणे बोगस डॉक्टरांनी रूग्णालय थाटले आहेत. बोगस डॉक्टरांकडे जाणाऱ्या रूग्णांची मोठ्या प्रमाणात लूट करण्यात येत आहे. मात्र नाईलाजाने रूग्णांना बोगस डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे. काही बोगस डॉक्टर एजन्टसुद्धा आहेत. त्यामुळे त्यांनी दवाखान्याच्या समोर बोर्ड लावून थेट दवाखान्याचा व्यवसाय थाटला आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र नसतांना केवळ मोठ्या शहरामध्ये चार ते पाच वर्षे परिचर म्हणून काम केल्याच्या अनुभवाखाली बहुतांश नागरिकांनी स्वत:चे रूग्णालय थाटले आहे. सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी यासह अन्य किरकोड आजारावर उपचार करून नागरिकांची सर्रास लूट केली जात आहे. गंभीर रूग्ण अशा डॉक्टरांकडे गेल्यास रूग्णांची थातूमातूर तपासणी करून त्यांना दुसऱ्या डॉक्टरकडे जाण्याचा सल्लाही हे बोगस डॉक्टर देत आहेत.
१०० च्यावर बोगस डॉक्टर
By admin | Published: June 16, 2014 11:29 PM