शासकीय योजनेतून मिळालेला निधीचा फक्त लाभ घेण्यापुरती शौचालयाचे थातूरमातूर काम पूर्ण करून शासकीय योजनेच्या आर्थिक लाभाचा एकदा धनादेश प्राप्त झाला की, त्या शाैचालयाचा वापर जळावू लाकडे ठेवण्यासाठी किंवा बाथरूम म्हणून लाभार्थी वापर करतात, असे प्रकार गावात बहुतेक ठिकाणी आहेत. एकदा शासकीय योजनेतील शाैचालयाचा लाभ मिळाल्यानंतर संबंधित अधिकारीही लाभार्थ्यांना घेतलेल्या योजनेची साधी चौकशी होत नाही. याचा परिणाम असा होत आहे की, लाभार्थी शौचालयाचा फार कमी वापर करतात. परिणामी मानवीकृत सार्वजनिक घाण तयार होऊन पावसाळ्याच्या दिवसात आजाराचे प्रमाण वाढतात.
आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बहुतेक गावातील गावाबाहेरील रस्त्याच्या कडेला नदीपात्रात गावाशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत नागरिक शाैचास बसतात. याचा परिणाम सार्वजनिक स्वच्छतेवर होत असून गावात आजार पसरण्यास कारणीभूत ठरत आहे.
(बॉक्स)
योजनेचा लाभ देऊच नका
सार्वजनिक स्वच्छता राखण्याची स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असतानादेखील याबाबत कोणतीही कार्यवाही किंवा जनजागृती केली नाही. सरकारी शाैचालयाचा लाभ घेऊन उघड्यावर शाैचास जाणाऱ्या लोकांवर कारवाई करावी व त्यांना शासकीय योजनेचा लाभ देऊ नये, अशी नागरिकांची मागणी आहे.