लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या हद्दीतील आणि नागरी वसाहतींमधील १०१ इमारती जीर्णावस्थेमुळे धोकादायक झाल्या आहेत. पावसाचे पाणी मुरल्यानंतर त्या कधीही कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अद्याप त्या इमारती पाडण्यासाठी ना संबंधीत इमारतींच्या मालकांनी पुढाकार घेतला आहे, ना नगर परिषद प्रशासनाने. त्यामुळे एखादा अपघात झाल्यास त्यासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.‘ब’ वर्ग नगर परिषद असणाºया गडचिरोलीत अर्धीअधिक वसाहत जुनी आहे. गेल्या १५ ते २० वर्षात नवीन वसाहती झाल्या असल्या तरी जुन्या वसाहतींमध्ये राहणारे नागरिक बरेच आहेत. विशेष म्हणजे शहराची मुख्य बाजारपेठसुद्धा जुन्या वस्तीमध्येच आहे. जुन्या वस्तीमधील किती इमारती जीर्ण झाल्या आहेत याचे सर्व्हेक्षण नगर परिषदेने गेल्यावर्षी (२०१६) केले. त्यात १०१ इमारती विविध कारणांमुळे धोकादायक झाल्याचे दिसून आले.त्या इमारतींची दुरूस्ती करण्यासाठी नगर परिषदेने महाराष्टÑ नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९५ अन्वये संबंधित इमारत मालकांना आॅगस्ट २०१६ मध्ये नोटीस बजावल्या. त्यात ३ महिन्यांच्या आत इमारतींची योग्य ती दुरूस्ती करावी आणि सदर इमारत राहण्यास योग्य आहे असा दाखला तज्ज्ञ इंनिनिअरकडून घेऊन तो नगर परिषदेकडे सादर करावा असे सूचविले. एवढेच नाही तर नोटीसप्रमाणे कार्यवाही न केल्यास आपणाविरूद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. तसेच इमारत पडल्यास किंवा त्या इमारतीमुळे बाजुच्या इतर इमारतींचे नुकसान झाल्यास होणाºया जीवित व वित्त हाणीस सर्वस्वी आपणच जबाबदार राहाल, असा दमही त्या नोटीसमधून भरण्यात आला. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. एक वर्ष झाले तरी अद्याप कोणीही इमारतींची दुरूस्ती केल्याचे किंवा इमारत पाडत असल्याचे नगर परिषदेला कळविलेले नाही. गडचिरोली शहरातील फुले वॉर्ड, गांधी वॉर्ड, रामनगर, हनुमान वॉर्ड, सर्वोदय वॉर्ड या वॉर्डात सर्वाधिक धोकादायक इमारती आहेत.‘लोकमत’ने काही जीर्ण इमारतींची प्रत्यक्ष पाहणी केली असता काही दुमजली इमारती ७५ ते ८० वर्षांपूर्वीच्या असल्याचे दिसून आले. या इमारतींच्या वरच्या मजल्यावर लोक राहात नसले तरी तळमजल्यावर दुकाने आहेत. ती दुकाने वरवर चकाचक दिसत असली तरी आतून इमारत जीर्ण आहे. काही इमारती भर मार्केट परिसरात आहे. त्यामुळे अपघात झाल्यास आजुबाजूच्या इमारतींनाही धोका होऊ शकतो. शिवाय प्राणहाणीची शक्यता नाकारता येत नाही.मनुष्यबळाची कमतरतागडचिरोली नगर परिषदेत नगर अभियंता, नगर रचनाकार ही अ वर्ग दर्जाच्या अधिकाºयांची पदे रिक्त आहेत. ब वर्गातील उपमुख्याधिकाºयाचे पद रिक्त आहे. याशिवाय क वर्गात येणाºया स्थापत्य पर्यवेक्षकांच्या तीन मंजुर पदांपैकी दोन रिक्त आहेत. रचना सहायकाच्या दोनपैकी एक पद रिक्त आहे. केवळ एका रचना सहायकाच्या भरोशावर शहरातील नवीन बांधकामांच्या नकाशांना मंजुरीपासून तर सर्व्हेपर्यंतची कामे करावी लागत आहे. अशा स्थितीत अतिक्रमण हटाव किंवा जीर्ण इमारतींवर बुलडोजर चालविण्यासाठी नगर परिषदेकडे मनुष्यबळच नसल्यामुळे अनेक कामे प्रलंबित आहेत. अशा स्थितीत जीर्ण इमारतींमुळे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
१०१ इमारती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 9:32 PM
गडचिरोली नगर परिषदेच्या हद्दीतील आणि नागरी वसाहतींमधील १०१ इमारती जीर्णावस्थेमुळे धोकादायक झाल्या आहेत.
ठळक मुद्देन.प. प्रशासन नोटीस बजावून मोकळे : कधीही होऊ शकते मुंबईसारखी दुर्घटना