जागतिक रक्तदान दिन : आजारांची तपासणी करून उपचारासाठी महिलांचे समुपदेशन लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जागतिक रक्तदान दिनानिमित्त गडचिरोली येथे आयोजित शिबिरात एकूण १०३ महिलांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्यात आली. गडचिरोली येथील खासगी रूग्णालयात आयोजित शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष योगीता पिपरे, जि. प. सदस्य वर्षा कौशिक यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक प्रमोद पिपरे, अंनिसचे जिल्हाध्यक्ष उद्धव डांगे, डॉ. उज्ज्वला बोरकर, आयोजक ग्रिष्मा मून, संगीता घोगरे उपस्थित होत्या. शिबिरात महिलांच्या विविध आजारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. महिलांना आजाराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले व उपचारासाठी समुपदेशनही करण्यात आले. महिलांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी, व निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा. प्रकृतीमध्ये बिघाड जाणवल्यास तत्काळ रूग्णालयात धाव घेऊन चिकित्सा करावी, नि:शुल्क शिबिराचा नेहमी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. शिबिराचे नियोजन व संचालन विवेक मून यांनी केले. यशस्वीतेसाठी राम बांगर, विनोद उके, सुनील मेश्राम, चंपा उईके, नितीन खापरे, संध्या कोडापे व रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सामान्य रुग्णालयातर्फे जनजागृती रॅली जिल्हा सामान्य रूग्णालयातर्फे जागतिक रक्तदाता दिनानिमित्त शहरात रॅली काढून बुधवारी जनजागृती करण्यात आली. गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातून काढण्यात आलेल्या रॅलीला नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी जि. प. सदस्य वर्षा कौशिक, नगरसेवक प्रमोद पिपरे, जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. शैलजा मैदमवार, आकार संस्थेचे अध्यक्ष संतोष बोलीवार, दिलीप कौशिक, अंकूश कुडावले, विकेश वैरागडे उपस्थित होते. जनजागृती रॅली शहरातील विविध भागातून फिरविण्यात आली. रक्ताची टंचाई भासू नये, याकरिता नागरिकांनी नेहमी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले. रॅलीचा समारोप झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात रक्तदानाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रचना कुलसंगे तर आभार अक्षय यांनी मानले. यशस्वीतेसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. रॅलीत शहरातील विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले.
१०३ महिलांची नि:शुल्क आरोग्य तपासणी
By admin | Published: June 15, 2017 1:27 AM