पेरमिली : अहेरी तालुक्याच्या पेरमिली परिसरातील २० ते २५ गावांमध्ये सतत विजेचा लपंडाव असताे. या भागातील नागरिक वीज समस्येने त्रस्त आहेत. थाेड्याशा वादळाने वीज पुरवठा खंडित हाेताे. ही समस्या ओळखून पाेलिसांनी विद्युत विभागाच्या अभियंत्यांशी चर्चा केल्याने आता एटापल्ली तालुक्यातून ३३ केव्ही लाईन पेरमिलीला जाेडली जाणार आहे. हे काम सुरू झाल्याने परिसरातील वीज समस्या सुटणार आहे.
पेरमिली येथे एटापल्ली-भामरागड-ताडगाव येथून वीज पुरवठा केला जाताे. हा परिसर जंगलव्याप्त असल्याने कर्मचाऱ्यांना विभाग शाेधण्यास अडचणी येतात. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून ते पावसाळा संपेपर्यंत वीज पुरवठा वारंवार खंडित हाेताे. या समस्येने नागरिक त्रस्त आहेत. अनेक नागरिक याबाबत पाेलिसांकडे तक्रार करीत हाेते. त्यामुळे पेरमिलीचे ठाणेदार पंकज सपकाळे, पीएसआय धनंजय पाटील यांनी पुढाकार घेऊन विद्युत विभागाच्या अभियंत्यांची भेट घेतली. अभियंत्यांनी एटापल्ली व्हाया येमली-मंगुटा-पेरमिली ११ केव्ही लाईन सप्लाय देण्यास हाेकार दिला. त्यानंतर कामही सुरू करण्यात आले. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येमली-पेरमिलीपर्यंतचे अंतर १० किमी आहे. विद्युत लाईन सुरळीत असल्याने काही बिघाड आल्यास लवकर दुरुस्ती करता येणार आहे. पाेलिसांच्या पुढाकाराने पेरमिली परिसराच्या २० गावांतील विद्युत समस्या सुटणार असल्याने नागरिकांनी पाेलिसांचे आभार मानले आहे.
बाॅक्स....
पेरमिली उपकेंद्राचा प्रस्ताव धूळ खात
पेरमिली परिसरात २० च्यावर गावे येतात. दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना वीज समस्येचा सामना करावा लागताे. परिसरातील नागरिकांनी ही समस्या सुटावी म्हणून दरवर्षी चक्का जाम आंदाेलन करून वीज वितरण कंपनी व शासनाचे लक्ष वेधले. नागरिकांच्या मागणीची दखल घेत वीज वितरण कंपनीने ११ केव्ही विद्युत उपकेंद्राचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. परंतु, हा प्रस्ताव अद्यापही मंजूर झाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नैराश्याची भावना आहे.