गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पथकांद्वारे वाहनांची तपासणी सुरू आहे. त्यानुसार १४ रोजी रात्री दोन ठिकाणी वाहनांतून ११ लाख १०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. शहरातील शासकीय विज्ञान महाविद्यालयासमोर ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात १६ मार्चपासून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू असून व्हिडीओ सर्वेक्षण पथक, भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे विविध ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे.
१४ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोली जवळील, महादेव मंदिरासमोर नाकाबंदी दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये १० लाख १०० रुपयांची रक्कम असलेली बॅग आढळून आली. याबाबत चालकाला समाधानकारक उत्तरे देता न आल्याने पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या निर्देशानुसार भरारी पथक प्रमुख खेमराज लेगनुरे यांनी ही रक्कम जप्त केली. याच ठिकाणी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाच्या कारच्या समोरील डिक्कीत एक लाख रुपये रोख रक्कम आढळून आली.
सदर रक्कम घराच्या बांधकामाकरिता भावाकडून आणली असल्याचे सांगितले, परंतु सदर रोख रकमेबाबत खात्री करणे गरजेचे असल्याने भरारी पथकाद्वारे ही रक्कम जप्त करून आर्थिक उलाढालीचे कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दोन्ही प्रकरणांत तपास सुरू असल्याची माहिती आचारसंहिता समितीचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी दिली.....पुरावे मागितलेदोन्ही प्रकरणांत या पैशांचा अधिकृत स्रोत काय, त्यासंबंधीचे पुरावे याबाबत संबंधितांकडे मागणी केली आहे. पुरावे सादर केले तर ही रक्कम संबंधितांना परत मिळू शकेल, अन्यथा ती शासनखाती जप्त करण्यात येणार आहे.