लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कंत्राटदाराअभावी रेंगाळलेल्या गडचिरोली शहरातील भूमिगत गटार योजनेच्या वाढीव सीएसअरला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या योजनेची किंमत आता १११ कोटी रुपये झाली आहे. भूमिगत गटार लाईनच्या कामासाठी आतातरी कंत्राटदार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.गडचिरोली शहरासाठी राज्य शासनाने भूमिगत गटार योजना एक वर्षापूर्वी मंजूर केली होती. त्यासाठी ९२ कोटी रूपये प्रस्तावित करण्यात आले होते. त्यापैकी २५ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने नगर परिषदेला उपलब्ध सुध्दा करून दिला होता. मात्र ९२ कोटी रूपयांत काम होणे शक्य नसल्याने कंत्राटदारांनी पहिल्या निविदेच्या वेळी वाढीव निविदा भरल्या होत्या. नगर परिषदेने सदर निविदा फेटाळल्या होत्या. त्यानंतर पाच ते सहा वेळा निविदा काढल्या. मात्र कंत्राटदारच मिळाले नाही.या योजनेसाठी वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगर परिषदेने राज्य शासनाकडे केली होती. निधी मिळावा, यासाठी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर राज्य शासनाने सुमारे १११ कोटी रुपयांच्या वाढीव निधीला मंजुरी दिली आहे. वाढीव निधीमुळे या योजनेला आता कंत्राटदार मिळून लवकरात लवकर भूमिगत गटार योजनेचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भूमिगत गटार योजनेसाठी १११ कोटींच्या वाढीव सीएसआरला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:41 PM