दिलीप दहेलकर ।आॅनलाईन लोकमतगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या प्राधिकरण व अधिसभेची निवडणूक १० डिसेंबर रोजी होणार आहे. सर्व मतदारसंघ मिळून एकूण ५२ जागांसाठी ११७ उमेदवारांनी नामांकन दाखल केले असून ११७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने स्वतंत्र निवडणूक कक्ष स्थापन केला आहे.चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी २ आॅक्टोबर २०११ रोजी स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठात शासनाच्या परिपत्रकानुसार गठित करण्यात आलेल्या विद्यापीठ अधिसभा, विद्वत्, व्यवस्थापन व अभ्यास मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे ३१ आॅगस्ट २०१७ रोजी या समित्या बरखास्त करण्यात आल्या. त्यानंतर निवडणुकीची अधिसूचना निर्गमित झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली.विद्यापीठाच्या कार्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, तसेच शिक्षणाची प्रक्रिया सुलभ व्हावी, या हेतूने विद्यापीठस्तरावर अधिसभा, विद्वत् आणि व्यवस्थापन परिषद आदी समित्या गठित केल्या जातात. याशिवाय विविध अभ्यासक्रमाचे मंडळही गठित केले जाते. विद्यापीठाच्या स्थापनेनंतर ११२ बी अंतर्गत शासनाने अडीच वर्षाकरिता या समित्या गठित केल्या होत्या. मात्र या समित्यांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे शासन निर्णयानुसार या समित्यांची निवडणूक होऊ घातली आहे.विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभेसाठी एकूण १० जागा आहेत. याकरिता सर्व प्रवर्ग मिळून ३१ जणांचे नामांकन प्राप्त झाले आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गाच्या पाच जागेसाठी १६ उमेदवार, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी चार, अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी तीन, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी तीन, ओबीसी प्रवर्गाच्या एका जागेसाठी तीन व महिला गटाच्या एका जागेसाठी दोन उमेदवारांचे नामांकन प्राप्त झाले आहे.प्राचार्य अधिसभेची एक जागा ओबीसी प्रवर्गासाठी आहे. याकरिता दोन नामांकन सादर करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांची सिनेटवर नियुक्ती केली जाते. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी पाच जागा आहेत. या पाच जागांसाठी १५ नामांकन दाखल करण्यात आले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी तीन, एसटी प्रवर्गाच्या एका जागेसाठी तीन, विमुक्त भटक्या प्रवर्गाच्या एका जागेसाठी तीन, ओबीसी प्रवर्गाच्या एका जागेसाठी चार तर महिला प्रवर्गाच्या एका जागेसाठी तीन अशा एकूण सिनेटच्या १० जागांसाठी ३१ नामांकन दाखल करण्यात आले आहे.विद्या परिषदेच्या चार जागांसाठी आठ नामांकन दाखल करण्यात आले आहे. या चारही जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान शाखेच्या एका जागेसाठी दोन, वाणिज्य व्यवस्थापनच्या एका जागेसाठी दोन, आंतरविज्ञान शाखीय अभ्यास यासाठी दोन व मानव विज्ञानच्या एका जागेसाठी दोन नामांकन दाखल करण्यात आले आहे. मानव विज्ञान शाखेच्या १२ जागांसाठी १८ नामांकन दाखल करण्यात आले आहे.यामध्ये हिंदी अभ्यास मंडळाच्या तीन जागेसाठी चार, मराठी अभ्यास मंडळाच्या तीन जागेसाठी पाच व इतिहास मंडळाच्या तीन जागेसाठी पाच नामांकन दाखल करण्यात आले आहे. वाणिज्य व्यवस्थापन भाषेच्या चार जागेसाठी चार प्राध्यापकांनी नामांकन दाखल केले आहे.विज्ञान, तंत्रज्ञान मंडळाच्या नऊ जागांसाठी १६ नामांकन दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये रसायनशास्त्रच्या तीन जागांसाठी चार, गणितच्या तीन जागांसाठी पाच व भौतिकशास्त्राच्या तीन जागांसाठी सात नामांकन सादर करण्यात आले आहेत.३३ मतदान केंद्र राहणारगोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभा, विद्वत् आणि व्यवस्थापन समित्या तसेच विविध अभ्यास मंडळाच्या निवडणुकांसाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मिळून एकूण ३३ केंद्रात ठेवण्यात आले आहेत. या ३३ केंद्रांवरून १० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात १३ तर चंद्रपूर जिल्ह्यात १९ केंद्र निश्चित करण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील चार ते पाच मदत केंद्र संवेदनशील क्षेत्रात आहेत. या केंद्रांवर सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत मतदान घेतले जाणार आहेत. तर उर्वरित सर्व केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.व्यवस्थापन परिषदेसाठी महिला गटातून नामांकनच नाहीगोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर खुल्या व राखीव गटाच्या मिळून एकूण सहा जागा आहेत. महिलांसाठी एक जागा राखीव आहे. मात्र या गटातून एकही नामांकन विद्यापीठ प्रशासनाकडे सादर करण्यात आले नाही. त्यामुळे येथील जागा रिक्त राहणार आहेत. व्यवस्थापनाच्या खुल्या प्रवर्गातील चार जागांसाठी आठ तर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या एका जागेसाठी तीन असे एकूण ११ नामांकन दाखल करण्यात आले आहेत.
गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठात ५२ जागांसाठी ११७ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:37 PM
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या प्राधिकरण व अधिसभेची निवडणूक १० डिसेंबर रोजी होणार आहे. सर्व मतदारसंघ मिळून एकूण ५२ जागांसाठी ११७ उमेदवारांनी नामांकन दाखल केले असून ११७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
ठळक मुद्दे१० डिसेंबरला मतदानविद्यापीठाच्या प्राधिकरणाची निवडणूक रंगात