गडचिराेली : मैत्री परिवार संस्था नागपूर व गडचिरोली पोलीस दलाच्यावतीने गडचिराेली येथे आयाेजित करण्यात आलेल्या सामुहिक विवाह साेहळ्यात जिल्हाभरातील ११९ आदिवासी जाेडपी विवाहबद्ध झाली. नातेवाईक, मान्यवर व भूमकांच्या मंत्राेच्चारात विवाह साेहळा गडचिराेली येथील लाॅनवर पार पडला.
पांढरा कुर्ता-पायजामा, पिवळ्या रंगाचे उपरणे आणि टोपी असा वेश केले. आदिवासी उपवर आणि पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या उपवधूंची गडचिराेली शहरातून मिरवणूक काढण्यात आली. जोडपी, त्यांचे नातेवाईक, गावकरी, आमंत्रित अशा सुमारे तीन हजारांच्या संख्येने विवाहाचा भव्य मंडप फुलून गेला होता. रविवारी सकाळी दहा वाजता भूमकांच्या मंत्रोच्चारात विवाह विधी पार पडले.
या साेहळ्यात ११९ आदिवासी जाेडपी विवाहबद्ध झाली. विशेष म्हणजे, यात १६ आत्मसमर्पित नक्षलवादी जाेडप्यांचाही समावेश आहे. विवाह साेहळ्याला जिल्हाभरातील ११९ जाेडपी व त्यांचे नातेवाईक उपस्थित राहणार असल्याने, त्यांच्या व्यवस्थेसाठी लाॅनवर भव्य मंडप उभारण्यात आला. विवाहापूर्वी गडचिराेली शहरातील मुख्य मार्गाने ढाेल-ताशांच्या गजरात वरात काढण्यात आली. त्यानंतर, सकाळी १० वाजता मंत्राेच्चारात विवाह साेहळा पार पडला.
त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाला आ. डाॅ. देवराव होळी, आ. कृष्णा गजभिये, एसपी अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, सोमय मुंडे, एसडीपीओ प्रनिल गिल्डा, एपीआय महादेव शेलार, गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, जिल्हा बँक अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, मैत्री परिवारचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, बाळासाहेब वरखेडे, सुनील चिलेकर, निरंजन वासेकर, घिसुलाल काब्रा, डॉ. उपेंद्र कोठेकर, पंडित पुरके आदी उपस्थित हाेते.
पाेलीस विभाग नक्षली कारावायांना आळा घालण्याबराेबरच आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने झटत आहे. आदिवासी आमचेच कुटुंबीय असून त्यांना मदत करणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले.
प्रास्ताविक प्रा. संजय भेंडे,संचालन प्रा. माधुरी यावलकर व महादेव शेलार तर आभार एसडीपीओ प्रनिल गिल्डा यांनी मानले.
संसाराेपयाेगी साहित्य भेट
- विवाहित जाेडप्यांना कपडे, पादत्राणे, संसारोपयोगी साहित्य, नववधूला सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे आदींचे वितरण करण्यात आले.
- धानोरा, गडचिरोली, कुरखेडा, पेंढरी, अहेरी, एटापल्ली, हेटरी, भामरागड, सिरोंचा व आत्मसमर्पित नक्षल्यांचे असे एकुण १० झोन करण्यात आले होते.
-पोलिसांनी घरचाच विवाह असल्याच्या आनंदात मिरवणुकीत नाचण्याची हौस पूर्ण केली.
- विवाहासाठी भव्य मंडप उभारण्यात आला हाेता.
मुलांनीही बघीतला आई-वडिलांचा विवाह
काही जोडपी आधीपासूनच ‘लिव्ह-इन’ मध्ये राहत होती. त्यामुळे या आदिवासी जोडप्यांपैकी अनेकांना एक किंवा दोन मुले होती. त्यांची मुलेही त्यांच्या विवाहाची साक्षीदार ठरली.