गडचिरोली : आश्रमशाळेतील प्रशासनात सुधारणा होऊन गुणवत्ता वाढावी या हेतूने राज्याच्या आदिवासी विकास विभागाने राज्यभरातील सर्व शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहे व खासगी अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली. मात्र गडचिरोली प्रकल्पातील १२ आश्रमशाळेतील १४ बायोमेट्रिक मशीन गेल्या तीन महिन्यांपासून बंद पडले आहेत. सदर मशीन पुणेला खासगी संस्थेकडे दुरूस्तीकरिता पाठविण्यात आल्याची माहिती आहे. आश्रमशाळेत मशीन कमी झाल्यामुळे हजेरी लावण्यासाठी उपलब्ध असलेल्या मशीनजवळ कर्मचारी व विद्यार्थ्यांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. तीन महिन्यांपासून बायोमेट्रिक मशीन बंद झालेल्या आश्रमशाळांमध्ये शासकीय आश्रमशाळा कारवाफा, अनुदानित आश्रमशाळा चामोर्शी, शासकीय आश्रमशाळा कोहका, इंग्रजी माध्यमांची शासकीय आश्रमशाळा गडचिरोली, शासकीय आश्रमशाळा पोटेगाव, अनुदानित आश्रमशाळा जपतलाई, शासकीय आश्रमशाळा मसेली, आश्रमशाळा खोब्रामेंढा, आश्रमशाळा पावीमुरांडा, आश्रमशाळा मुरूमगाव, आश्रमशाळा पेंढरी व शासकीय आश्रमशाळा वडेगाव आदी १२ आश्रमशाळांचा समावेश आहे. कारवाफा व चामोर्शी येथील आश्रमशाळेतील दोन मशीन गेल्या तीन महिन्यांपासून बंद पडले आहेत व उर्वरित १० आश्रमशाळेतील प्रत्येकी १ बायोमॅट्रीक मशीन बंद पडली आहे. बंद पडलेल्या बायोमेट्रिक मशीनसंबंधित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांनी गडचिरोलीच्या प्रकल्प कार्यालयात जमा केल्या. त्यानंतर प्रकल्प कार्यालयाच्यावतीने सदर बिघाड निर्माण झालेल्या मशीन पुणे येथील खासगी कंपनीकडे दुरूस्तीकडे पाठविल्या आहेत. मात्र खासगी कंपनीने तीन महिन्याचा कालावधी लोटूनही बिघाड निर्माण झालेल्या मशीनची दुरूस्ती केली नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या व दोन बायोमेट्रिक मशीनवर आश्रमशाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांना हजेरी लावावी लागत आहे. बायोमेट्रिक मशीन लवकर दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
१२ आश्रमशाळेतील बायोमेट्रिक मशीन बंद
By admin | Published: November 03, 2014 11:25 PM