धानोरा : तालुक्यातील लेखा ग्रामपंचायतीची स्थापना १९६२ साली करण्यात आली. तेव्हापासून या ग्रामपंचायतीमध्ये १२ निवडणुका घेण्यात आल्या. मात्र प्रत्येक वेळी ग्रामपंचायत सदस्य निवडीपासून ते सरपंच व उपसरपंचाच्या निवडीपर्यंतची सर्वच प्रक्रिया अविरोध पार पडली आहे. मागील ५३ वर्षांपासून सतत अविरोध सदस्यांची निवड होणारी राज्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत असल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे. लेखा ग्रामपंचायतीअंतर्गत लेखा, मेंढा व कन्हारटोला ही तीन गावे येतात. यातील मेंढा हे गाव ‘दिल्ली, मुंबई मावा सरकार, मावा नाटे, मावा राज’ या संकल्पनेसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर बांबू विक्रीचा स्वामित्व अधिकार मिळविणारे देशातील पहिले गाव म्हणूनही या गावाची ओळख आहे. १९६२ साली लेखा येथे ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासून या ग्रामपंचायतीची १२ वेळा निवडणुका घेण्यात आल्या. मात्र प्रत्येकवेळा सदस्यांची निवड अविरोधच करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी होणारा शासकीय खर्च, गावात निर्माण होणारे वाद यापासून दूर राहण्याच्या उद्देशाने प्रत्येकवेळी निवडणूक अविरोध करण्यात येत आहे. लेखा येथून दोन, मेंढा येथून तीन व कन्हारटोला येथून दोन असे एकूण सात सदस्य निवडून दिले जातात. सदस्यांच्या निवडणुकीदरम्यान प्रत्येक गावात सभा घेतली जाते व सभेदरम्यान गावातील नागरिक सदस्यांची निवड करतात. त्यानंतर सदस्यांमधूनच सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात येते. हा उपक्रम मागील ५३ वर्षांपासून राबविला जात आहे. सतत १२ वेळा अविरोध निवडणूक घेऊन लेखा ग्रामपंचायतीने शासनाचा लाखो रूपयांचा खर्च वाचविला आहे. परंतु या ग्रामपंचायतीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सुरेश उसेंडी, मधुकर झंझाळ, रामचंद्र राऊत, चिन्नू दुग्गा, नाजुकराव, नरेश तोफा, वामन वाढई, बाबुराव उईके, मनिराम कुमोटी, जनार्धन मोहुर्ले, अशोक सोनुले, मधुकर हलामी, भारत शेंडे, मारोती पदा आदी उपस्थित होते. लेखा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक ५ जानेवारी रोजी पार पडली. सदर निवडणूकसुद्धा अविरोधच झाली. सरपंचपदी प्रीती वसंत पोटावी तर उपसरपंचपदी विनोद विठ्ठल गुरनुले यांची अविरोध निवड झाली. ग्रा. पं. सदस्य म्हणून जयराम सोमा उईके, ताराबाई रमेश मैंद, विनोद श्यामराव करंगामी, नंदा गोमेश दुग्गा, शिला वसंत आतला यांची निवड झाली आहे. सरपंच, उपसरपंच निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार प्रदीप इंदुरकर, तलाठी आर. पी. नवले, ग्रा. पं. सचिव आर. एस. कुनघाडकर यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)
१२ व्यांदा लेखाची निवडणूक अविरोध
By admin | Published: January 07, 2016 2:07 AM