लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शिक्षक दिनी बुधवारला जिल्ह्यातील १२ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा शानदार सोहळा जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात रंगला. समाज विकासात शिक्षकांची भूमिका अतिशय मोलाची आहे. त्यामुळे भावी पिढी सुजाण व कौशल्यपूर्ण घडविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे आवाहन जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी उद्घाटक म्हणून जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) फरेंद्र कुत्तीरकर, समाज कल्याण सभापती माधुरी उरेते, महिला व बालकल्याण सभापती जयसुधा जनगाम, जि.प. सदस्य संपत आळे, वैशाली ताटपल्लीवार, विद्या आभारे, मितलेश्वरी खोब्रागडे, मिना कोडापे, पं.स. सभापती दुर्लभा बांबोळे, उपसभापती विलास दशमुखे, वडसाचे पं.स. सभापती मोहन गायकवाड, मुलचेराच्या सभापती सुवर्णा एगलोपवार, पं.स. सदस्य अर्चना ढोरे, बबिता उसेंडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी लामतुरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी निवड करण्यात आलेल्या १२ आदर्श शिक्षकांना शाल, श्रीफळ, रोख १ हजार १००, पुष्पगुच्छ, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सपत्नीक गौरविण्यात आले. पुढे बोलताना जि.प. अध्यक्ष भांडेकर म्हणाल्या, आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांपासून इतर शिक्षकांना प्रेरणा मिळावी तसेच गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, या उद्देशाने पुढील वर्षीपासून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षकांना रोख ११ हजार रूपये पुरस्कारापोटी देऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवर यांनी दुर्गम व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी जि.प. शाळांच्या शिक्षकांवर आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या पध्दतीने घडवावे, असे सांगितले. याप्रसंगी आसरअल्ली केंद्र शाळेचे पुरस्कारप्राप्त शिक्षक सुरेश चुधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख, संचालन केंद्र प्रमुख राजू वडपल्लीवार यांनी केले.या आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदानजि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील १२ आदर्श शिक्षकांचा पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. यामध्ये आसरअल्ली शाळेचे शिक्षक सुरेश रामचंद्र चुधरी, कोयनगुड्डा शाळेचे शिक्षक विनित बंडू पद्मावार, बुर्गी शाळेच्या वनिता मारोतराव कन्नाके, निमगाव शाळेचे देवेंद्र जगन्नाथ लांजेवार, हेटीनगर शाळेच्या वच्छला डोंगरूजी नरोटे, मोहुर्ली शाळेचे अशोक धाडूजी बोरकुटे, कुनघाडा माल शाळेचे प्रभाकर पोचन्ना आचेवार, भुऱ्यालदंड शाळेचे संतोष नामदेव टिकले, किन्हाळा शाळेचे अविनाश बालाजी ठाकरे, खुर्सा शाळेचे सुरेश लक्ष्मण वासलवार, डोंगरगाव शाळेचे रवींद्र काशिनाथ सोमनकर व माध्यमिक विभागातून एटापल्ली येथील हायस्कूलचे विनय लालसिंग चव्हाण आदींचा समावेश आहे. या सर्व आदर्श शिक्षकांनी सपत्नीक पुरस्कार स्वीकारला.
१२ आदर्श गुरूजींचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 1:17 AM
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शिक्षक दिनी बुधवारला जिल्ह्यातील १२ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा शानदार सोहळा जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात रंगला.
ठळक मुद्देजि.प.मध्ये रंगला सोहळा : समाजाच्या विकासात शिक्षकांची भूमिका मोलाची- योगिता भांडेकर