नसबंदी केली खुली : गडचिरोली पोलीस प्रशासनाचा पुढाकार; पोलीस अधीक्षकांनी दिली रुग्णालयाला भेटगडचिरोली : आयुष्याचा उमेदीचा काळ नक्षलवाद्यांच्या चळवळीत जंगलात घालविल्यानंतर माओवाद्यांकडून करण्यात आलेली नसबंदी समाजाच्या मुख्य प्रवाहात दाखल झाल्यावर पोलीस प्रशासनाने खुली करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वैवाहिक जीवन सुखकारक जगण्याचा मार्ग १२ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी शस्त्रक्रियेतून बुधवारी खुला झाला. पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी लोकमतशी बोलताना स्वागत केले. आम्हाला खऱ्या अर्थाने समाजात वैवाहिक जीवन घालविण्याची संधी पोलीस प्रशासनाच्या या निर्णयामुळे मिळाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नागपूर येथील शासकीय रुग्णालयाचे वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारूखी यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या चमूने बुधवारी १२ विवाहित आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नसबंदी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया पार पाडली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. १ ला भेट देऊन नसबंदी शस्त्रक्रिया खुली करण्यात आलेल्या आत्मसमर्पितांची विचारपूस केली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. नसबंदी खुली करण्यात आलेल्या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांमध्ये डीव्हीसी कंपनी क्र. ४ चा सदस्य बिरजू ऊर्फ क्रिष्णा मासा दोरपेटी, कंपनी क्रमांक ४ चा सदस्य किशोर ऊर्फ मधुकर पेका मट्टामी, चातगाव दलमचा कमांडर विजय ऊर्फ धनीराम केशरी दुग्गा, कंपनी क्र. ४ चा प्लाटून कमांडर जगदीश ऊर्फ रमेश रैनू कातवो, गट्टा दलमचा सदस्य आशिष ऊर्फ टिबरू ऊर्फ साईनाथ नरसय्या पेंदाम, कंपनी क्र. १० चा सेक्शन कमांडर जुगरू ऊर्फ रामजी कोलू मज्जी, कंपनी क्र. १० चा सेक्शन कमांडर चिन्ना ऊर्फ चुटे ऊर्फ पुसू महागू नैताम, कंपनी क्र. २ चा सेक्शन उपकमांडर दीपक ऊर्फ किशोर ऊर्फ अशोक दसरू ओक्शा, प्लाटून क्र. ११ चा कमांडर सुक्कु ऊर्फ महारू राजू मुड्यामी, कंपनी क्र. १० चा सेक्शन कमांडर सैनू सोमजी हेडो, कंपनी क्र. १० चा सदस्य दिनेश ऊर्फ रानू मुरा पोटावी व कोरची दलमचा सदस्य मधु ऊर्फ सुरेश चमरू हिचामी यांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
१२ आत्मसमर्पितांचे वैवाहिक जीवन बहरणार
By admin | Published: December 31, 2015 1:29 AM