गडचिरोली : डोक्यावर पिवळा फेटा... पिवळे पोशाख, मुंडावळ्या... वधूंच्या पायात नवी कोरी चप्पल तर बूट घालून वर थाटात.. चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद... तब्बल दोन किलोमीटर लांब वरात व आदिवासी गोंडी मंगलाष्टकांसह १२७ जोडप्यांच्या एकाच मांडवात रेशीमगाठी जुळून आल्या. पोलिस दल व नागपूरच्या मैत्री परिवार संस्थेच्या पुढाकारातून २६ मार्चला शहरातील चंद्रपूर रोडवरील एका मंगल कार्यालयात सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. आठ आत्मसमर्पित नक्षली जोडपीही या वेळी विवाहबद्ध झाली.
पिपाणीचा लयबद्ध सूर.. ढोलताशांच्या गजरात मूल रोडवरील मंगल कार्यालयातून वरातीला सुरुवात झाली. हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावर वरात मुख्य व्यापारपेठेतून इंदिरा गांधी चौकातून पुन्हा लग्नमंडपात पोहोचली. गोंडी मंगलाष्टकांनी हा सोहळा पार पडत आहे. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, निरंजन वासेकर, दिलीप ठाकरे, मंजूषा जोशी, अश्विनी भांडकेर आदींनी यासाठी अथक परिश्रम घेतले.
वरातीत पोलिसांनी धरला ठेका...
वरातीच्या मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या. शहरातून वरात निघाली तेव्हा समोर नातेवाइकांची पावले थिरकली. या वेळी पोलिसांनाही ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही. पोलिस समोर नाचताना पाहून वधू-वर भारावून गेले होते.
जोडप्यांना प्रशिक्षण, देणार रोजगार
पोलिस प्रशासनाकडून जोडप्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांचे संसार उभे करण्यात सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. पोलिस दलाकडून आदिवासींच्या उत्थानासाठी दादालोरा खिडकी या उपक्रमातून विविध योजना राबविल्या जातात. त्यातून या जोडप्यांना लाभ दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य
वधूला डोरले, मंगळसूत्र, वधू-वरांना नवे कपडे, १८ प्रकारच्या वस्तूंचा समावेश असलेले संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. जोडप्यांच्या आई-वडिलांना अहेर दिला. वऱ्हाडींच्या मिष्टान्न भोजनाची सोय केली होती.
गोंडी मंगलाष्टकांसह लग्नसोहळा
आदिवासी गोंडी समाजाच्या चालीरीती व परंपरेनुसार सामूहिक विवाह सोहळ्यात सर्व विधी पार पडले. या वेळी जल, जंगल व जमिनीला साक्षी मानून गोंडी मंगलाष्टकांसह विवाह सोहळा झाला. अग्नीच्या साक्षीने सात फेरे मारून वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातले. त्यानंतर वरांनी वधूंच्या गळ्यात मंगळसूत्र व पायात जोडवे घातले.