लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पहिल्या वर्ग हा शिक्षणाची पहिली पायरी आहे. त्यामुळे पहिल्या वर्गाचा प्रवेश विद्यार्थ्यांसोबतच पालकांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या पाल्याचा पहिल्या वर्गातील पहिल्या दिवसाची आठवण पालक कायमची स्मरणात ठेवतात. त्यामुळे पहिल्या वर्गातील प्रवेशाचे विशेष महत्त्व आहे. या वर्षी जिल्ह्यातील १३ हजार ४३५ बालके पहिल्या वर्गात प्रवेश घेणार आहेत.
एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाला आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग विशेष सतर्क असते. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी त्यांच्या गावांतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांमधून सहा वर्षे पूर्ण होत असलेल्या बालकांची यादी घेतली. या बालकांच्या पालकांची भेट घेऊन त्यांचे प्रवेश करून घेतले, तसेच शाळापूर्व मेळावा घेऊन पालकांना शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यामुळे शाळेबद्दल पालक व विद्यार्थी अगोदरच परिचित झाले आहेत. जुलै महिन्यापासून शाळेला सुरुवात होते. शाळेच्या पहिल्या दिवशी बालकाला गणवेश, पुस्तके मिळाल्यास त्यांचा आनंद द्विगुणीत होतो. शाळेविषयी त्याच्या मनात प्रेम निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश व पुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागामार्फत केला जात आहे.
तालुकानिहाय दाखलपात्र विद्यार्थीतालुका विद्यार्थीगडचिरोली १.४०७आरमोरी १३१५देसाईगंज ८०३कुरखेडा ११८२कोरची ७५३धानोरा १.४३४चामोर्शी २,०१७मूलचेरा ६६१अहेरी १३१५एटापल्ली १.२२१भामरागड ४७३सिरोंचा ८५४एकूण विद्यार्थी १३,४३५
शाळापूर्व मेळाव्यांना ठिकठिकाणी प्रतिसाद• पहिल्या वर्गात दाखल होणाऱ्या बालकाला व त्याच्या पालकाला शाळेविषयी माहिती असावी, यासाठी एप्रिल महिन्यात शाळापूर्व तयारी मेळावे घेण्यात आले. या दरम्यान विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. • विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडींची चाचणी घेण्यात आली. पालकांना विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पहिल्या वर्गात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा अगोदरच परिचित झाली आहे. पटसंख्येसाठी शिक्षकांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.