गडचिरोली : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरात आणल्या जाणाऱ्या सुमारे १४ पेट्या दारू व चारचाकी वाहन जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई शनिवारी मूल मार्गावरील पारडी येथील तपासणी नाक्यावर करण्यात आली. संदीप नारायण कोवे, नागेश रविंद्रनाथ बुरेवार (दोघेही रा. नागपूर) यांना अटक करण्यात आली आहे.तर वाहन मालक प्रकाश मेलाराम गोधणी व नागपूर येथील सम्राट वाईन शॉपचा मालक या दोघांविरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून दारू व इतर अवैध वस्तूंची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन वैनगंगा नदीजवळ तपासणी नाका तयार करण्यात आला आहे.या नाक्यावर मूल मार्गे येणा-या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते. दरम्यान (एमएच -३१-डी-५१११) या चारचाकी वाहनात सुमारे १४ पेट्या विदेशी दारू आढळून आली. या दारूची किंमत २ लाख १ हजार ६०० रुपये एवढी होते. तर चारचाकी वाहनाची किंमत २ लाख २० हजार रुपये आहे. वाहन व दारू असा एकूण ४ लाख २१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संदीप कोवे (३३) व नागेश बुरेवार (३०) या दोघांना अटक करून त्यांना दारूबाबत विचारणा केली असता, सदर दारू नागपूर येथील सम्राट वाईन शॉप येथून आणण्यात आली आहे.तसेच वाहन प्रकाश गोधणी याच्या मालकीचे असल्याचे सांगितले. त्यानुसार या दोघांवरही दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीचे मुख्य केंद्र गडचिरोली शहर आहे. वाहनात आढळलेली पूर्ण दारू विदेशी आहे. त्यामुळे सदर दारू लोकसभेच्या निवडणुकीत वितरित करण्यासाठी आणली जात असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. ही कारवाई मंडळ अधिकारी एस. एस. बारसागडे, पी. के. भंडारे, वनरक्षक एन. व्ही. वेदांती, एच. व्ही. मडावी, तुषार मेश्राम यांच्या पथकाने केली.
गडचिरोलीत आणल्या जाणाऱ्या 14 पेट्या दारू जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 4:31 PM