लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेतर्फे इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारी बुधवारपासून घेण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारीला इंग्रजी विषयाचा पहिलाच पेपर सकाळी ११ ते २ या वेळेत होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुके मिळून या परीक्षेसाठी एकूण ४६ केंद्र ठेवण्यात आले असून या केंद्रांवरून जुने व नवे मिळूण एकूण १४ हजार ३५४ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये १७६ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभाग विभागामार्फत इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत व निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आली असून या केंद्रांची जबाबदारी विभागातील सर्व अधिकारी, केंद्र अध्यक्ष व मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. शाळा स्तरावर शिक्षण विभागाच्या वतीने कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे.इयत्ता बारावीच्या परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकूण सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक, उपशिक्षणाधिकारी (माध्य.), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), डायटचे प्राचार्य यांचे एक व महिलांच्या एक स्वतंत्र पथकाचा समावेश आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात या परीक्षेसाठी एक विशेष पथक गठित करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.परीक्षा मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २२ फेब्रुवारी रोजी हिंदी, २३ फेब्रुवारीला मराठी, २४ फेब्रुवारीला सहकार, २६ फेब्रुवारीला कला शाखेचा सचिवाची कार्यपद्धती, राज्यशास्त्र तर विज्ञान शाखेचा भौतिकशास्त्र विषयाचा पेपर होणार आहे. २८ फेब्रुवारीला वाणिज्य शाखेचा वाणिज्य व्यवस्थापन, कला शाखेचा इतिहास तर विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र विषयाचा पेपर होणार आहे. ३ मार्चला गणित तर ६ मार्चला जीवशास्त्र विषयाचा पेपर घेण्यात येणार आहे. ७ मार्चला कला शाखेचा कलाशास्त्र, ९ मार्चला अर्थशास्त्र, १३ मार्चला भूगोल तर १५ ते १७ मार्चदरम्यान माहिती तंत्रज्ञान विषयाचा पेपर होणार आहे.हे आहेत जिल्ह्यातील नवे परीक्षा केंद्रमहाराष्टÑ राज्य माध्यमिक तथा उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेच्या वतीने राज्यभरातील परीक्षा केंद्राची यादी जाहीर करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील काही जुने परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले असून नव्या परीक्षा केंद्रास मान्यता देण्यात आली आहे. गतवर्षी गडचिरोली जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास ३६ परीक्षा केंद्र होते. मात्र यावर्षी परीक्षा केंद्राच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली असून पाच नवे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. या नव्या परीक्षा केंद्रांमध्ये भगवंतराव ज्युनिअर कॉलेज सिरोंचा, किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय वैरागड, देशबंधू चित्तरंजनदास येनापूर, विदर्भ कनिष्ठ महाविद्यालय पोटेगाव व भगवंतराव ज्युनिअर कनिष्ठ महाविद्यालय मुलचेरा आदी केंद्रांचा समावेश आहे.
१४ हजार ३५४ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 11:18 PM
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेतर्फे इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारी बुधवारपासून घेण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारीला इंग्रजी विषयाचा पहिलाच पेपर सकाळी ११ ते २ या वेळेत होणार आहे.
ठळक मुद्देजिल्हाभरात ४६ केंद्र : सहा भरारी पथकांची राहणार करडी नजर