चांदाळा या गावात दारूचा महापूर आहे. या गावाच्या माध्यमातून तालुक्यातील बोदली, जेप्रा, जेप्रा चक, राजगाटा माल, राजगटा चक, उसेगाव व जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरासह इतर गावातसुद्धा दारू पुरविल्या जाते. सोबतच गावात मद्यपींची लाईन लागलेली असते. यामुळे परिसरातील अनेक गावे त्रस्त झाले आहेत. याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. गडचिरोली पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या चांदाळा परिसरात कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार चांदाळा व माडेमुल जंगल परिसरात शोधमोहीम राबवत दारू अड्डे उध्वस्त केले. तसेच पाच ते सहा ठिकाणी टाकलेला ५ लाख ५६ हजार रुपये किमतीचा १४० ड्रम मोहसडवा व साहित्य नष्ट करण्यात आली. याप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या चार जणांवर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गडचिरोलीचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार वानुजी कावळे, प्रमोद वाळके, श्रीराम करकाळे, खुशाल कोसनकर, प्रीतम बारसागडे, होमगार्ड पथक व मुक्तिपथ तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.
१४० ड्रम मोहसडवा केला नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:44 AM