गडचिरोली : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महासचिव प्रियंका गांधी येत्या १४ डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून आठवी ते पदवी अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या विद्यार्थिनींना बॅटरीवर चालणाऱ्या स्वयंचलित सायकलींचे वाटप केले जाणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ते म्हणाले, हा पूर्णत: अराजकीय कार्यक्रम आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो मुलींना ३ ते ५ किलोमीटरवरून सायकलीने शाळा-कॉलेजमध्ये यावे लागते. त्यांचे श्रम वाचावे आणि शिक्षणातील त्यांचा उत्साह वाढण्यासाठी अशा होतकरू मुलींना स्वयंचलित सायकली द्याव्यात, अशी कल्पना प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी मांडली. त्यासाठी काही कंपन्यांना विनंती केली. त्यांनी योग्य प्रतिसाद दिल्यामुळे विजय किरण फाऊंडेशन आणि त्या कंपन्यांच्या मदतीने गडचिरोली जिल्ह्यात १५ हजार, तर ब्रह्मपुरी क्षेत्रातील ५ हजार मुलींना या सायकलींचे वाटप होणार आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर कोरोनाच्या नियमांचे पालन करत हा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लडकी हूँ, लढ सकती हूँ
मुलींच्या सक्षमीकरणाचा एक भाग म्हणून त्यांच्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संकल्पना प्रियंका गांधींना आवडली. त्यामुळे ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ या त्यांच्या टॅगलाईनला पूरक असलेल्या या कार्यक्रमाला येण्याचे त्यांनी मान्य केले. राज्यात त्यांच्या उपस्थितीत होणारा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम असल्यामुळे तो ऐतिहासिक ठरेल, अशा विश्वास यावेळी शिवानी वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.