लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: भामरागड तालुक्यातील प्रसिद्ध समाजसेवा केंद्र लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक कुटुंब एक झाड या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.जेष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व डॉ.सौ.मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, लोकबिरादरी हॉस्पिटलचे संचालक डॉ.दिगंत आमटे, डॉ.अनघा आमटे, पुण्याचे मिलिंद गोडसे, सौ.शर्वरी गोडसे, लोकबिरादरी आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी 1 ते 7 ऑक्टोबरला प्रशासनातर्फे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. सदर वन्यजीव सप्ताहानिमित्ताने व महात्मा गांधी तथा लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर 2020 ला एक कुटुंब एक झाड या उपक्रमांतर्गत प्रकल्पाचे मोकळ्या जागेत विविध जातींच्या 105 वृक्षांचे रोप लावण्यात आले. प्रकल्पातील प्रत्येक कुटुंबांनी एक झाड लावले. वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रकल्पातील बहुसंख्य महिला, पुरुष व लहान मुले उपस्थित होते. क्रिडाशिक्षक विवेक दुबे व त्यांच्या श्रमदान चमूनी मोलाचे सहकार्य केले.