३० हजार गोणी तेंदू संकलन : एटापल्ली तालुक्यातील ग्रामसभा मालामालएटापल्ली : पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या एकूण ३१ ग्रामपंचायतींपैकी २२ ग्रामपंचायतीने अनुसूचित क्षेत्रातील (पेसा अंतर्गत) विकल्प पर्याय २ निवडून स्वत: ग्रामसभेने तेंदू घटकाचा लिलाव केला आहे. तेंदूपत्ता संकलनातून ग्रामपंचायतींना १६ कोटी १ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.नियमानुसार ग्रामपंचायतीच्या सचिवाला ग्रामसभेचे सचिव म्हणून ठेवावे लागते. मात्र चोखेवाडा ग्रामसभेने परस्पर तेंदूपत्त्याचा लिलाव केला. त्यामुळे या ग्रामपंचायतीची आकडेवारी पंचायत समितीकडे उपलब्ध नाही. तसेच कंत्राटदाराने ग्रामसभेला हाताशी धरून अत्यंत कमी दरात तेंदू घटक विकत घेतले आहेत. येमली, जवेली बुज, घोटसूर, मानेवारा, तुमरगुंडा, उडेरा, गेदा, सेवारी, हालेवारा, कोटमी, गर्देवाडा, वांगेतुरी, जांभिया, गुरूपल्ली, पुरसलगोंदी, गट्टा, जारावंडी, वडसा खुर्द, दिंडवी, नागुलवाडी या २१ ग्रामपंचायतीने तेंदू घटकाचा जाहीर लिलाव केला आहे. या भागातून २८ हजार ९७६ गोणीचे संकलन झाले आहे. एटापल्ली नगर पंचायत क्षेत्रातून २ हजार २५० प्रमाणित गोणीचे तेंदू संकलन झाले आहे. या सर्व तेंदूपत्त्यातून १६ कोटी रूपयांपेक्षा जास्त उत्पन्न ग्रामसभेला मिळणार आहे. बुर्गी, तोडसा, वागेझरी, कोहका, मेंढरी, कसनसूर, जवेली खुर्द, सोहगाव, कांदोळी या ग्रामपंचायतींनी पर्याय १ निवडून वन विभागाच्या मार्फतीने तेंदू घटकाचे लिलाव केले आहेत. तेंदूपत्त्याला माता निघाली. त्याचबरोबर मागील वर्षीच्या तुलनेत तेंदूपत्ताही कमी आला आहे. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन पाहिजे त्या प्रमाणात झालेले नाही. त्यामुळे कंत्राटदार चिंतेत सापडले आहेत. मात्र राष्ट्रीयस्तरावर तेंदूपत्त्याला यावर्षी चांगला भाव मिळाल्याने झालेला तोटा भरून निघण्यास मदत होणार आहे. एटापल्ली तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी सामूहिक पद्धतीने लिलाव केल्याने मागील वर्षीच्या तुलनेत तेंदूपत्त्याला चांगला भाव मिळाला आहे. (तालुका प्रतिनिधी)ट्रकने तेंदूपत्ता रवाना करण्यास सुरुवाततेंदूपत्ता गोळा करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सुरुवातीचा पत्ता पूर्णपणे सुकला आहे. त्यामुळे सदर तेंदूपत्ता उचलण्याचे काम सुरू झाले आहे. जून महिन्याला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे पाऊस कधीही जोर धरू शकतो. पाऊस आल्यास तेंदूपत्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. काही फळ्या नदीपात्रात लावल्या जातात. पाऊस झाल्यास तेंदूपत्ता वाहून जातो व वादळामुळेही तेंदूचे पुडे उडून जातात. त्यामुळे सुकलेला पत्ता उचलण्याचे काम कंत्राटदारांनी काम सुरू केले आहे. सदर काम आणखी आठ दिवस चालणार आहे.
तेंदूतून १६ कोटींची उलाढाल
By admin | Published: June 03, 2016 1:20 AM