धान साठवणुकीची व्यवस्था होणार : उर्वरित १२ गोदामांचे काम पोहोचले अंतिम टप्प्यात गडचिरोली : शासनाच्या अतिरिक्त केंद्रीय सहाय्य निधी अंतर्गत जि. प. च्या कृषी विभागामार्फत एकूण २८ कृषी गोदामांपैकी १६ कृषी गोदामाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित १२ गोदामांचे काम ९० टक्क्यापेक्षा अधिक झाले असून ते अंतिम टप्प्यात आहे. खरीप हंगामातील धानपिक शेतकऱ्यांच्या हातात येण्यापूर्वी सदर सर्वच २८ कृषी गोदामाचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना धान साठवणुकीची व्यवस्था होणार आहे. सन २०१३-१४ मध्ये अतिरिक्त केंद्रीय सहाय्य निधी अंतर्गत जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने बाराही तालुक्यात एकूण २८ कृषी गोदाम मंजूर करण्यात आले. या कृषी गोदामांची एकूण अंदाजपत्रकीय किमत ५ कोटी ५२ लाख ३६ हजार रूपये आहे. सदर सर्वच कृषी गोदाम १५० मेट्रिक टन क्षमतेचे असून एका गोदामाची अंदाजपत्रकीय किमत १९ लाख ४४ हजार रूपये इतकी आहे. गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या अधिक असून येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानपिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाच्या साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना कृषी गोदामाची व्यवस्था नव्हती. त्यामुळे अनेक शेतकरी पडत्या भावात धानाचे पीक हाती आल्याबरोबर धान व्यापाऱ्यांना विकत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक भाव मिळत नव्हता. परिणामी शेती व्यवसाय तोट्यात जात होता. सदर बाब लक्षात आल्यानंतर जि.प.च्या कृषी विभागाने जिल्हाधिकारी, राज्य शासन, केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून कृषी गोदाम बांधण्याचा प्रस्ताव सादर केला. आता कृषी गोदाम पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यांना या ठिकाणी धान व खरीप हंगामातील इतर पिकांची साठवणूक करता येणार आहे. यापूर्वीही शासनाच्या एकात्मिक कृती आराखड्यांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सन २०१२-१३ या वर्षात २४ कृषी गोदामांना मंजुरी प्रदान करण्यात आली. सन २०१४-१५ वर्षाच्या अखेरीस सर्वच २४ गोदामाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले व सदर गोदाम संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला हस्तांतरीत करण्यात आले आहेत. या गोदामाची साठवणूक क्षमता २०० मेट्रिक टन असून प्रती गोदामाची अंदाजपत्रकीय किमत २२ लाख रूपये आहे. सन २०१४-१५ वर्षाच्या अखेरीस तब्बल ५ कोटी २८ लाख रूपये खर्चातून जिल्ह्यात २४ कृषी गोदामाचे काम पूर्ण करण्यात आले. सदर कृषी गोदामामुळे गडचिरोली जिल्ह्यात धान साठवणुकीची व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कृषी विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या कृषी गोदामात धानाची साठवणूक करून चढ्या दराने शेतकऱ्यांनी धानाची विक्री करावी, असे आवाहन जि.प. कृषी विभागाने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी) पूर्ण झालेले कृषी गोदाम केंद्रीय सहाय्य निधी अंतर्गत गडचिरोली तालुक्यातील बोदली, पोर्ला, गुरवळा, धानोरा तालुक्यातील कारवाफा, मेंढा, देसाईगंज तालुक्यातील चोप, कुरखेडा तालुक्यातील सोनसरी, चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा, विक्रमपूर, कोनसरी, मुलचेरातील लगाम, बोलेपल्ली, तसेच पेरमिली, इंदाराम, किष्टापूर, विठ्ठलरावपेठा, कोत्तापल्ली, गेदा, जाफ्राबाद व कोठी येथील गोदामाचे बांधकाम पूर्ण झाले आहे अशी माहीती आहे. ग्रामपंचायतस्तरावरील समिती व्यवस्थापन करणार बांधण्यात आलेल्या कृषी गोदामाची देखभाल व व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे. सदर समिती या कृषी गोदामाचे भाडेदर निश्चित करणार आहे. शिवाय गोदामात साठवणूक करण्यात आलेल्या धानावर नियंत्रण ठेवणार आहे. या कृषी गोदामातून ग्रामपंचायतीला आर्थिक स्त्रोत निर्माण होणार असल्याने ग्रामपंचाचयतीचे उत्पन्न वाढण्यासाठी मदत होणार आहे. तसेच कृषी गोदामामुळे शेतकऱ्यांना धान विक्रीतून अधिक उत्पन्न मिळणार आहे.
१६ कृषी गोदामांचे काम पूर्ण
By admin | Published: July 24, 2016 1:25 AM