जिल्ह्याबाहेर बदली : पोलीस अधीक्षकांनी केले कामाचे कौतुकगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात बदली झालेल्या तीन पोलीस निरीक्षकांसह १४ सहायक पोलीस निरीक्षकांना जिल्हा पोलीस दलातर्फे गुरूवारी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात भावपूर्ण निरोप देण्यात आला. दरम्यान, बदली झालेल्या १७ ही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली, असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी काढले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) मंजुनाथ सिंगे, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) महेश्वर रेड्डी, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, नवनाथ ढवळे, गणेश बिरादार आदी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, सुहास आव्हाड, वैभव माळी तसेच पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, अनिल पाटील, उमेश बेसरकर यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.याप्रसंगी बदली झालेल्या उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस विभागातील कामाचे अनुभव यावेळी कथन केले. मंचावर उपस्थित इतर अधिकाऱ्यांनी बदली झालेल्या अधिकाऱ्यांना शुभेच्छा प्रदान केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, संचालन महिला पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील यांनी केले तर आभार पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार यांनी मानले. कार्यक्रमाला गडचिरोली पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
१७ पोलीस अधिकाऱ्यांना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2016 1:36 AM