मशागतीला सुरुवात : कमी पावसामुळे रबीची पेरणी घटण्याची शक्यतागडचिरोली : रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी राष्ट्रीयकृत बँका तसेच सहकारी बँकांना १७ कोटी २७ लाख रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने खरीप हंगामात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. सुमारे दीड लाख हेक्टरवर धानाची रोवणी केली जाते. त्याचबरोबर खरीप हंगामामध्ये तूर, कापूस आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी पाऊस कमी पडल्याने खरीपातील पिके संकटात सापडली आहेत. पाण्याअभावी धानपीक करपायला लागले आहे. खरिपाबरोबरच जिल्ह्यात ज्वारी, गहू, मका, चणा, करडई, मोहरी, तीळ, सूर्यफूल, भाजीपाला आदी रबी पिकांचे उत्पादन घेतले जाते. चालू रबी हंगामात सुमारे ७७ हजार २१५ हेक्टरवर रबी पिकांची लागवड होईल, यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. वाढता उत्पादन खर्च लक्षात घेऊन शेतकऱ्याला सावकाराच्या दारात उभे होण्याची पाळी येऊ नये, त्याचबरोबर पिकांची मशागत योग्य पद्धतीने करता यावी, यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले जाते. चालू रबी हंगामात १७ कोटी २७ लाख रूपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सर्वाधिक उद्दिष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिले आहे. रबी हंगामाची मशागत सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुद्धा सुरुवात केली आहे. मात्र ३० सप्टेंबपर्यंत एकाही शेतकऱ्याने रबी पिकासाठी कर्जाची मागणी केली नाही. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीत ओलावा कमी आहे. त्यामुळे रबी पिकही संकटात येण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)
रबी कर्जासाठी १७ कोटींचे उद्दिष्ट
By admin | Published: October 18, 2015 1:40 AM