देसाईगंज : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींचे निकाल घाेषित झाले आहेत. यात सुमारे ८६ महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे, तर नाेटाला २००९ मतदारांनी मतदान केले आहे.
देसाईगंज तालुक्यात १७ ग्रामपंचायतींच्या ५९ प्रभागांतील १६१ सदस्यांसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. २६ उमेदवार आधीच अविरोध निवडून आले आहेत. त्यात ५ पुरुष व २१ महिलांचा समावेश आहे. १३५ जागांसाठी मतदान झाले. त्यात महिला उमेदवारांनी बाजी मारली असून तब्बल ८६ जागांवर निवडून आल्या आहेत. तर ७५ पुरुष उमेदवार निवडून आलेले आहेत. तालुक्यातील २००९ मतदारांनी नाेटासाठी मतदान केले आहे. यावरून त्यांना त्यांच्या प्रभागात उभे असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसल्याचे दिसून येत आहे. उमेदवारांनी साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून मतदारांना माेहित करण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदारांनी आपला काैल मात्र आपल्या पसंतीच्या उमेदवारालाच दिला असल्याचे दिसून येते. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतींवर नवखे उमेदवार निवडून आले आहेत.
तालुक्यातील विसोरा, आमगाव, एकलपूर, किन्हाळा, चोप, कोंढाळा, कोकडी या गावांत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावली हाेती, मात्र त्यांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. काही ठिकाणी अटीतटीची लढत हाेऊन प्रस्थापितांचा अत्यंत कमी फरकाने पराभव झाला असल्याचे दिसून येते.
बाॅक्स
सरपंचपदाच्या आक्षणावर सर्व गणिते निर्भर
मागील वर्षीपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगाेदरच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले जात हाेते. सरपंचपद हे ग्रामपंचायतीत महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे ज्या प्रवर्गासाठी सरपंचपद आहे, त्याच जागेसाठी माेठी लढत हाेत हाेती. वेळप्रसंगी भांडणे हाेत हाेती. हे टाळण्यासाठी शासनाने या वर्षी पहिल्यांदाच निकालानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले आहे. त्यामुळे सरपंचपद अजूनही गुलदस्त्यात आहे. एखाद्या पॅनलकडे स्पष्ट बहुमत असूनही त्यांच्याकडे सरपंचपद जाहीर झालेल्या प्रवर्गाचा उमेदवार नसल्यास त्यांना सरपंचपदावर पाणी फेरावे लागणार आहे. तर बहुमत नसतानाही आरक्षणामुळे काही जणांना सरपंचपद मिळणार आहे.