दोन वाहने घेतली ताब्यात : देसाईगंजातील वन विभागाच्या नाक्याजवळ केली कारवाई देसाईगंज : देसाईगंज येथे दारू घेऊन येणाऱ्या चारचाकी वाहनांचा पोलिसांनी पाठलाग करून दोन वाहनांसह सुमार े१७ लाख रूपयांची दारू जप्त केली आहे. सदर कारवाई २ मे रोजी देसाईगंज वन विभागाच्या नाक्याजवळ केली. सडक अर्जूनी तालुक्यातील शेंडा येथून देसाईगंज शहरात दारू आणली जात असल्याची गुप्त माहिती ठाणेदार रवींद्र पाटील यांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे २ मे रोजी सकाळी ११.३० वाजता गौरनगर-एकलपूर जोड मार्गावर सापळा रचण्यात आला. अर्जूनी मार्गावरून एक टवेरा व बोलेरो हे वाहन येत असल्याचे दिसले. पोलिसांनी हात दाखवून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही वाहन चालकांनी वाहने थांबविली नाही. त्यामुळे देसाईगंज पोलिसांनी दोन्ही वाहनांचा पोलीस वाहनांच्या सहाय्याने पाठलाग केला. एमपीएच-३३-जी-२२५८ क्रमांकाचे बोलेरो वाहन व एमएच-३४-एए-०२३५ क्रमांकाचे टवेरा वाहन देसाईगंज वन विभागाच्या नाक्याजवळ थांवबून वाहनचालकांसह चौघांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये विनोद आनंदराव राऊत (२४) रा. मालडोंगरी ता. ब्रह्मपुरी, संघपाल रामचंद्र पिलारे (२६) रा. मेळघाट ता. लाखांदूर, मकसूद नशिर बेग (३५) रा. ब्रह्मपुरी व रंगदेव दीनबाजी वंजारी (५०) रा. साकोली यांचा समावेश आहे. वाहनांची चौकशी केली असता, वाहनामध्ये सहा लाख रूपयांची दारू आढळून आली. पिकअप वाहनाची किंमत सहा लाख रूपये तर टवेरा वाहनाची किंमत पाच लाख रूपये एवढी आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात अशोक मिर्झा, रामभाऊ मेश्राम, अरूण जुआरे, जितू भोयर, सीताराम लांजेवार, श्रीराम खरकाटे, रेखचंद्र पत्रे यांनी केली. देसाईगंज तालुक्याची सीमा भंडारा जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात देसाईगंज शहरात व तालुक्यात दारूची वाहनांद्वारे वाहतूक केली जाते. मात्र देसाईगंज पोलिसांनी भंडारा जिल्ह्यातून अर्जूनीमार्गे येणाऱ्या वाहनांवर विशेष पाळत ठेवण्यात सुरुवात केली आहे. जप्त वाहने सरकारजमा करण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. (वार्ताहर)
दारूसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त
By admin | Published: May 03, 2017 1:32 AM