गडचिरोली: छत्तीसगडमध्ये पोलिस आणि माओवादी यांच्या झालेल्या चकमकीत १८ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. या चकमकीत ३ जवान जखमी झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या आधी ही घटना घडल्याने गडचिरोलीतील पोलिस अलर्ट झाले आहेत.
माओवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबूजमाड जंगलातील छत्तीसगडच्या छोटे बेठिया पोलिस ठाणे क्षेत्रात ही चकमक झाली. यात माओवाद्यांचा कमांडर शंकर राव व कमांडर ललिता ठार झाली आहे. चकमकीच्या ठिकाणी १८ मृतदेह सापडले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आधुनिक रायफल, सात AK ४७ रायफल, ३ LMG जप्त करण्यात आले आहेत. चकमकीत ठार झालेला शंकर राव याच्यावर २५ लाखांचे बक्षीस होते. गडचिरोलीपासून १९ किलोमीटर अंतरावर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात गडचिरोली- चिमूर लोकसभेसाठी १९ एप्रिलला मतदान होत आहे. यानुषंगाने १६ एप्रिललाच १५ हजारांहून अधिक सुरक्षा जवान तैनात झाले आहेत. दुर्गम, अतिदुर्गम भागात हेलिकॉप्टरने मतदान यंत्र व अधिकाऱ्यांना पोहोचविण्यात आले आहे. मतदानाच्या तीन दिवस आधीच छत्तीसगड सीमेवर छत्तीसगड पोलिस व माओवाद्यांतील चकमकीनंतर १८ जवानांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. माअवोद्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या घटनेच्या अनुषंगाने माओवादी खवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सजग असून सीमावर्ती भागात आधीपासूनच सर्व हालचालींवर नजर ठेवली जात आहे. अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी सर्व तयारीनीशी जवान सज्ज आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.
छत्तीसगडच्या जवानांवर अचानक गोळीबार अन्....बीएसएफ आणि जिल्हा राखीव गार्ड यांची संयुक्त टीम नक्षलविरोधी अभियानासाठी जात असताना त्यांच्यावर माओवाद्यांनी अचानक गोळीबार केला. प्रत्युत्तरात छत्तीसगडच्या जवानांनीही गोळीबार केला. या चकमकीत १८ नक्षलवादी ठार झाले. कांकेर येथे २६ एप्रिल रोजी म्हणजेच दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. कांकेर लोकसभा मतदारसंघात ८ विधानसभा मतदार संघ येतात. यातील सहा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत. बस्तर जिल्ह्याचा एक भाग असलेल्या कांकेरला १९९८ साली वेगळे करत स्वतंत्र जिल्हा करण्यात आले होते.