अंकिसा : असरअल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत चिंतरेवला नदीतून तेलंगणा राज्यात सागवान लाकडाचे १८ लठ्ठे अवैधरीत्या नेण्याचा प्रयत्न वन विभागाच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. वन विभागाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली. जप्त केलेल्या सागवानाचे मूल्य अंदाजे दीड लाख रुपये आहे.
या कारवाईदरम्यान वन कर्मचारी आरोपींना पकडण्यासाठी गेले असता आरोपींनी नदीत उडी मारली. त्या आरोपींना पोहता येत नव्हते. वन कर्मचाऱ्यांनी त्यांना वाचवत ताब्यात घेतले. ही कारवाई सिरोंचाचे उपवनसंरक्षक सुमित कुमार, उपविभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली असरअल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील, वनरक्षक सडमाके, चिचघरे, कोठारे, दडमल, वागाडे, अजय इरकिवर, ताराम, उईके आदी कर्मचाऱ्यांनी केली.
या परिसरातील सागवान लठ्ठे चोरट्या मार्गाने तेलंगणा राज्यात निर्यात केले जातात. त्यामुळे वन विभागाला गस्त करत सतर्क राहावे लागते.