मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलविरोधी अभियान राबविताना रविवारी (दि.१७) एका तरुण पोलीस उपनिरीक्षकासह एका जवानाला वीरमरण आले. आठ वर्षाच्या कालावधीनंतर नक्षलविरोधी अभियानात पोलीस अधिकाऱ्याचा बळी गेला. यासोबतच नक्षली हिंसेत बळी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची संख्या १९ तर जवानांची संख्या १९२ वर पोहोचली आहे. आत्मसमर्पण आणि चकमकीत मरण पावणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या वाढल्याच्या वैफल्यातून हे हिंसक कृत्य घडवून त्यांनी आणल्याचे दिसून येते.आतापर्यंत नक्षली हिंसाचारात पोलीस कर्मचारी बळी पडण्याच्या घटना अनेक झाल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या घटना मोजक्याच आहेत. त्यात रविवारच्या घटनेची भर पडली. यापूर्वी ८ वर्षाआधी म्हणजे २४ मार्च २०१२ रोजी धानोरा तालुक्यातील कारवाफाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ३ उपनिरीक्षकांसह १० पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. त्याआधी ४ऑक्टोबर २०१० रोजी अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे नक्षल्यांनी आधी भूसुरूंग स्फोट घडवून नंतर गोळीबार केला होता. त्यात सीआरपीएफचे १ निरीक्षक, जिल्हा पोलीस दलाचे २ उपनिरीक्षक आणि एक जवान शहीद झाले होते. तत्पूर्वी ८ ऑक्टोबर २००९ रोजी भामरागड तालुक्यातील लाहेरीजवळ नक्षल्यांनी केलेल्या गोळीबारात जिल्हा पोलीस दलाच्या एका उपनिरीक्षकासह १६ कर्मचाऱ्यांना शहीद व्हावे लागले होते.
आजच्या बंदला आदिवासींचा फलकातून विरोध२ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टीच्या जंगलात झालेल्या चकमकीत कसनसूर दलमच्या विभागीय समितीची सदस्य सृजनक्का पोलिसांच्या गोळीने ठार झाली होती. त्याचा निषेध म्हणून नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी पोस्टर, बॅनर्स लावून २० मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. परंतू आदिवासी विकास सेवा समितीने अनेक ठिकाणी नक्षलविरोधी पोस्टर लावून बंदचे आवाहन धुडकावले आहे.
बदल्याची रणनितीदोन वर्षापूर्वी गडचिरोली पोलीस दलाने दोन दिवसात ४० नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्याचा बदला म्हणून गेल्यावर्षी १ मे रोजी नक्षलवाद्यांनी जांभुळखेडाजवळ भूसुरूंग स्फोट घडविला. त्यात १५ जवानांना शहीद व्हावे लागले. काही दिवसांपूर्वीच जहाल नक्षली सृजनक्का हिचा पोलिसांच्या गोळीने वेध घेतला. त्याचा बदला म्हणून नक्षल्यांनी रविवारी पोलीस दलावर हल्ला करून दोघांचा बळी घेतला.