बसमध्ये बिघाड : अहेरी आगाराचा लेटलतीफपणा चव्हाट्यावरएटापल्ली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर आगाराची बस नागपूरवरून एटापल्लीकडे येत असताना एटापल्ली मार्गावर रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक बंद पडली. दुरूस्ती पथक वेळेवर न पोहोचल्याने या बसमधील तब्बल १९ प्रवाशांना रात्रीचे चार तास घनदाट जंगलात घालवावे लागले. या घटनेमुळे अहेरी आगाराचा लेटलतीफपणा चव्हाट्यावर आला आहे.महामंडळाच्या नागपूर आगाराची एटापल्ली मुक्कामी असणारी सदर शेवटची बस आहे. सदर बस सायंकाळच्या सुमारास नागपूरवरून निघाल्यानंतर रात्री ८ वाजताच्या दरम्यान आलापल्लीपासून १० किमी अंतरावर तोंडेल फाट्याजवळ बंद पडली. या बसमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. बस बंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर बसचालकांनी अहेरी आगाराला भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. अहेरी आगार प्रशासनाने रात्री उशीरा ११.२५ वाजता घटनास्थळावर बस दुरूस्ती पथक पाठविले. तब्बल एका तासानंतर सदर बस सुरू झाली. या बसमध्ये एकूण २५ प्रवाशी होते. यापैकी सहा प्रवाशी खासगी वाहनधारकांना मदत मागून ते निघून गेले. उर्वरित प्रवाशांमध्ये आठ पुरूष, सात महिला व चार लहान मुले होती. या १९ प्रवाशांना घनदाट तोंदेल जंगलात चार तास घालवावे लागले. सदर बस दुरूस्तीनंतर १२.३० वाजता एटापल्ली मुख्यालयी पोहोचली. तोंदेल जंगल परिसरात भ्रमणध्वनी सेवेचे कव्हरेज राहत नसल्याने प्रवाशांना आपल्या कुटुंबियांना या प्रकाराची माहिती तत्काळ देता आली नाही. त्यामुळे प्रवाशांचे कुटुंबिय प्रचंड चिंतेत सापडले होते. अहेरी आगाराच्या भोंगळ कारभारामुळे या बसमधील प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अहेरी आगाराच्या अनेक बसगाड्या या जुन्या असल्याने असे प्रसंग वारंवार घडतात. (तालुका प्रतिनिधी)
१९ प्रवाशांनी चार तास घनदाट जंगलात घालविले
By admin | Published: March 01, 2016 12:53 AM