लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खरीप हंगामाला सुरूवात झाल्यापासून ७ हजार ३३५ मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे. जिल्हाभरातील खत विक्रेत्यांकडे सुमारे १९ हजार २८३ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. त्यामुळे खताची टंचाई निर्माण होणार नाही, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.सुमारे २ लाख हेक्टरवर खरीप पिकांची लागवड केली जात आहे. त्यापैकी दीड लाख हेक्टरवर धान पीक लावले जाते. त्यामुळे धानाच्या रोवणीला सुरूवात होताच रासायनिक खतांची मागणी वाढली आहे. दोन वर्षांपूर्वी मागणीपेक्षा खताचा पुरवठा कमी होत असल्याने खताची टंचाई निर्माण होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकची किंमत देऊन खत खरेदी करावे लागत होते. खताचा काळाबाजार टाळण्यासाठी खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध होईल. या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. जून महिन्यात गडचिरोली जिल्ह्याला २० हजार २२८ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले. मागील वर्षीचे ५ हजार ८९० मेट्रिक टन खत शिल्लक होते. खरीप हंगामात ७ हजार ३३५ मेट्रिक टन खताची विक्री करण्यात आली. त्यामुळे आता दुकानदारांकडे १९ हजार २८३ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी ४८ हजार ३८० मेट्रिक टन आवंटन मंजूर करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने या खताचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे यावर्षी खताचा तुटवडा जाणवणार नाही.
१९ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:24 AM