लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुक्याच्या नवग्राम शेतशिवार व जंगल परिसरात पाेलिसांनी छापा मारून लपवून ठेवलेला गूळ व माेहाचा सडवा, तसेच साहित्य मिळून एकूण १ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १६ सप्टेंबर राेजी गुरुवारी केली. नवग्राम गावालगतच्या जंगल परिसरात हातभट्टीची दारू गाळण्यासाठी ठिकठिकाणी गूळ व माेहाचा सडवा टाकून ठेवला असल्याची गाेपनीय माहिती चामाेर्शी पाेलिसांना मिळाली. या माहितीवरून चामाेर्शी पाेलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बिपीन शेवाळे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह शेतशिवार व जंगल परिसर गाठले. दाेन पंचासह पाहणी केली असता, एका खड्ड्यात २०० लीटर क्षमतेच्या पाच नग प्लास्टिक ड्रममध्ये ८०० लीटर इतका माेहसडवा सापडला. याची किंमत ड्रमसह ८४ हजार रुपये आहे. लगतच झुडपी जंगलात २०० लीटर क्षमतेच्या पाच ड्रममध्ये एक हजार लिटर माेहसडवा सापडला. याची किंमत ड्रमसह एक लाख पाच हजार रुपये आहे, तसेच महिला विक्रेती लता संजय मिश्रा हिच्या घरी १० हजार रुपये किमतीची ५० लिटर गूळ व माेहाची दारू सापडली. हा सर्व मिळून एकूण १ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला. ही कारवाई प्रभारी अधिकारी बिपीन शेवाडे यांच्या नेतृत्वात पाेलीस उपनिरीक्षक शंकर कुडावले, पाेलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे, ज्ञानेश्वर लाकडे, देवेंद्र मजोके, एस.पी.ओ. चंपत मडावी, तसेच पाेलीस कर्मचाऱ्यांनी केली.
सणांच्या कालावधीत दारू विक्रीला ऊतपाेळा, गणेशाेत्सव या सणासुदीच्या कालावधीत चामाेर्शी तालुक्याच्या दुर्गम व ग्रामीण भागात देशी, विदेशी, माेहफूल दारूची विक्री वाढल्याचे दिसून येत आहे. पाेलिसांकडून कारवाई हाेत असली तरी रात्रीच्या सुमारास आडमार्गाने जिल्ह्याबाहेरून दारू येत असल्याचे चित्र आहे. दारू विक्रीला पूर्णत: राेख लावण्यासाठी चामाेर्शी शहर व तालुक्यातील सर्व प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करणे गरजेचे आहे. त्याशिवाय दारूची आयात-निर्यात थांबणार नाही.
घटनास्थळीच नष्ट केला गुळ व माेहसडवा- रासायनिक परीक्षणासाठी थाेडासा माल वेगळा काढून ठेवण्यात आला. उर्वरित सर्व मुद्देमाल पाेलिसांनी घटनास्थळी प्लास्टिक ड्रमसह नष्ट केला. याप्रकरणी आराेपी सराेनीत हरसिद सिकदार, महेश मनाेरंजन मंडल व लता संजय मिश्रा, सर्व रा. नवग्राम यांच्यावर चामाेर्शी पाेलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फाैजदार रमेश काेडापे व पाेलीस हवालदार याेगेश्वर वाकुडकर करीत आहेत. या कारवाईमुळे नवग्राम परिसरातील दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. छुप्या मार्गाने दारू येत असते.