प्रधानमंत्री पीक विमा योजना : २२,२६७ शेतकऱ्यांनी काढला विमागडचिरोली : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २२ हजार २६७ शेतकऱ्यांनी यंदा एकूण ३० हजार १७५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा काढला असून या विम्यापोटी सदर शेतकऱ्यांनी २ कोटी ४२ लाख ८४ हजार रूपयांचे प्रिमिअम भरले आहे.गतवर्षी राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून जवळपास ११ हजार शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांचा विमा काढला. मात्र यंदा विविध बँकांचे कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा काढण्यास सक्तीचे करण्यात आले. त्यामुळे पीक विमा योजनेस यंदा शेतकऱ्यांकडून दुपटीवर प्रतिसाद मिळाला आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी यंदा ८३७ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा काढला आहे. या विम्याच्या हप्त्यापोटी एकूण २२ हजार २६७ शेतकऱ्यांनी २ कोटी ४२ लाख ८४ हजार रूपयांचे प्रिमिअम भरले आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी असल्याने गडचिरोली जिल्ह्यात दुष्काळस्थिती निर्माण झाली होती. गतवर्षी गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ५ हजार ४९९ शेतकऱ्यांनी विम्याचा लाभ घेतला. विमा काढलेल्यांपैकी ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांना २ कोटी ९० लाख ९० हजार रूपयांच्या विम्याचा लाभ जिल्ह्यातील बँकांनी मिळवून दिला आहे. गतवर्षी विमा योजनेंतर्गत विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ११ हजार १५२ होती. मात्र यंदा पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. कृषी विभागाच्या प्रभावी जनजागृतीमुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद या योजनेला चांगला मिळाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
२ कोटी ४२ लाख ८४ हजारांचे प्रिमिअम
By admin | Published: November 04, 2016 12:12 AM