दुष्काळात मागणी वाढली : सहा महिन्यांतील स्थितीगडचिरोली : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असून एप्रिल २०१५ ते आजपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ७१५ नागरिकांना रोजगार मिळाला आहे. त्याचबरोबर या कालावधीत सुमारे २० लाख ३४ हजार ३६८ मनुष्य दिवस रोजगार मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नाही. त्यामुळे येथील शेतीच्या भरवशावर नागरिकांना काही महिन्याचा रोजगार मिळते. धानाच्या शेतीत जवळपास तीन महिने रबी हंगामात दोन महिने असे एकूण पाच महिने सोडले तर इतर सात महिने रिकामेच राहण्याची पाळी येते. अशा परिस्थितीत बहुतांश मजूर रोहयोच्या कामांना विशेष पसंती देतात. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे धान शेतीही रोजगार देऊ शकली नाही. उलट अनेकांचे शेत पडिक आहेत. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी सुध्दा रोहयोच्या कामावर जाण्यास पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे या कामाची मागणी वाढली आहे. काही तालुक्यांमध्ये पावसाळाभर रोहयोची कामे सुरू होती. २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीपासून बाराही तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. कामाची मागणी करूनही रोजगार न दिल्यास बेरोजगारी भत्ता द्यावा लागते. त्यामुळे प्रशासनही रोजगाराची मागणी होताच काम उपलब्ध करून देते. बाराही तालुक्यात चालू आर्थिक वर्षात सुमारे १ लाख १८ हजार ७५० नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. २ हजार ५८५ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार दिला आहे. तर याच कालावधीत सुमारे २० लाख ३४ हजार ३६८ मनुष्य दिवस रोजगाराची निर्मिती झाली आहे. रोजगार हमी योजनेमुळे शेतीवरील कामाचा ताण कमी होऊन बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास फार मोठी मदत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)मजुरी विलंबाबात तक्रारी वाढल्यामागील काही महिन्यात रोजगार हमी योजनेच्या कामाची मजुरी तत्काळ मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही गावातील मजुरांना पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी मजुरी मिळाली नाही. रोहयोच्या कामावर जाणारे बहुतांश मजूर हातावर आणून पानावर खाणारे राहतात. अशा परिस्थितीत चार महिन्यांपासून मजुरी मिळाली नाही. त्यामुळे सदर कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. परिणामी रोहयोबाबत मजुरांच्या मनात शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रोहयोतून २० लाख मनुष्य दिवस रोजगार
By admin | Published: October 12, 2015 1:46 AM