लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तालुक्यातील काटली येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ अभियानातर्फे एक दिवसीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून एकूण २० रुग्णांनी पूर्ण उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्धार केला. शिबिराला भेट दिलेल्या रुग्णांना दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची सवय सोडण्यासाठी तसेच यातून उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. दारूची सवय कशी लागते, शरीरावर त्याचे कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे आदींची माहिती देत अरुण भोसले यांनी समुपदेशन केले. शिबिर संयोजक प्रमोद कोटांगले यांनी रुग्णांची माहिती घेतली. शिबिराचे नियोजन तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केले. शिबिर यशस्वीतेसाठी गाव संघटनेचे सदस्य अरविंद चौधरी यांनी सहकार्य केले.