कोट्यवधींचा खर्च व्यर्थ : सुशिक्षित बेरोजगार व्यवसाय उभारणीच्या प्रतीक्षेतलोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत २० टक्के मूलभूत सुविधेच्या निधीतून देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत सन २००७ ते २०१० या तीन वर्षांच्या कालावधीत तालुक्यात अनेक ठिकाणी दुकान गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. विविध ठिकाणी जवळपास १८ ते २० दुकान गाळ्यांचे काम पूर्ण झाले. मात्र सदर दुकान गाळे रिकामे पडून आहेत. या दुकान गाळ्यांवर शासनाचे कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले. मात्र दुकान गाळे रिकामे असल्याने तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार व्यवसाय उभारणीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते.स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत तालुक्यात जवळपास सहा ठिकाणी १८ ते २० दुकान गाळ्यांचे काम २०१० पर्यंत पूर्ण करण्यात आले. सदर दुकान गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी तत्कालीन संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी अर्ज मागविण्याची प्रक्रिया पार पाडली होती. मात्र त्यानंतर काय झाले हे कळायला मार्ग नाही. २०१० पासून बांधण्यात आलेले दुकान गाळे रिकामेच आहेत. राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी करण्यासाठी तसेच महिला सशक्तीकरण या योजनेतून रिकाम्या हातांना काम देण्याच्या योजनांची शासनाकडून अंमलबजावणी केली जाते. मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे व दफ्तर दिरंगाईमुळे शासकीय योजनांचा लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याचे दिसून येते. संबंधित विभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तालुक्यातील दुकान गाळे लाभार्थी बेरोजगारांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महिला बचतगट व बेरोजगार युवक, युवतींनी केली आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. लाखो रूपयांचा महसूल बुडालास्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले देसाईगंज तालुक्यातील जवळपास १८ ते २० दुकान गाळे गेल्या चार-पाच वर्षांपासून रिकामे पडून आहेत. सदर दुकान गाळे सवलीतच्या दरात भाडे तत्त्वावर सुशिक्षित बेरोजगारांना उपलब्ध करून दिले असते तर भाड्याच्या माध्यमातून पंचायत समिती प्रशासनाला लाखो रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले असते. मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे बांधकाम पूर्ण झालेले सर्वच गाळे रिकामे असल्याने शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडाला आहे.
२० दुकान गाळे रिकामेच
By admin | Published: May 25, 2017 12:39 AM