गडचिरोली : शेजारच्या मित्राकडे खेळण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय बालिकेला आपल्या घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम युवकाला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यू.एम. मुधोळकर यांनी २० वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
प्राप्त माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी म्हणजे १४ जुलै २०१९ रोजी चामोर्शी तालुक्यातील वाकडी येथील आरोपी चतुर ऊर्फ चेतन मारोती मेश्राम (२३ वर्षे) याने पीडित मुलगी शेजारच्या घराबाहेर एकटी खेळत असल्याचे पाहून तिला आपल्यासोबत आपल्या घरी नेले आणि त्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित बालिकेची आई सायंकाळी शेतातून घरी आल्यानंतर तिला झालेला प्रकार कळला. बालिकेच्या आईने आरोपी युवकाच्या आईला हा प्रकार सांगितला; पण आरोपी आपला गुन्हा कबूल करण्यास तयार होत नव्हता.
पीडित बालिकेचे वडील आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी चामोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी चेतन मेश्राम याच्यावर भादंवि कलम ३७६ (अ, ब) तसेच कलम ४, ६ बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या प्रकरणात आरोपीला ठोठावलेली दंडाची रक्कम ५० हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. अनिल प्रधान यांनी कामकाज पाहिले. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे यांनी केला.