गडचिरोली-
राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण-२०२० जाहीर केले असून, त्याची अंमलबजावणी केली जात असून या धोरणाचे फायदे जास्तीत जास्त कृषी ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभर १ मार्च ते १४ एप्रिल २०२१ पर्यंत राबविण्यात येत असलेल्या कृषी ऊर्जा पर्व अंतर्गत गडचिराेली मंडळातील एकूण २०५ महिला कृषिपंपधारकांनी थकबाकीमुक्तीची वाट धरली आहे. या महिला कृषिपंपधारकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
महा कृषी ऊर्जा अभियान अंतर्गत ‘कृषी ऊर्जा पर्व’ व कृषिपंप वीज धोरण २०२० बद्दल माहिती पुस्तिका आणि पोस्टरचे विमोचन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बराठे यांना माहिती पुस्तिका देण्यात आली. यावेळी गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता रवींद्र गाडगे उपस्थित होते. माझे वीजबिल माझी जबाबदारी असा नारा देत गडचिरोलीतून सायकल रॅली काढण्यात आली.
या ऊर्जा पर्व अंतर्गत ४३२ ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत, ४३२ ग्राहक मेळावे,२१ सायकल रॅली,२३३ बांधावर महावितरणचे अधिकारी यांनी जाऊन-कॅपॅसिटरचा वापरामुळे कृषिपंपांना योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळणे, कृषिपंप हाताळतांना घेण्यात येणारी खबरदारी, वीजसुरक्षा याबाबत प्रबोधन केले तसेच महिला कृषिपंपधारकांना कृषी ऊर्जा पर्व व लाभाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे.