पांडुरंग कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कघोट : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत घोट उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत १० केंद्रांवरून सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात एकूण ६२ हजार ८९ क्विंटलची धान खरेदी करण्यात आली. यापैकी २१ हजार २३७ क्विंटल धान उघड्यावर ठेवण्यात आले आहे. सदर धानाची भरडाईसाठी उचल करण्याच्या कामाकडे महामंडळाकडून दिरंगाई होत आहे. परिणामी पावसाळ्यात सदर धानाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.घोट उपप्रादेशिक कार्यालय अंतर्गत मक्केपल्ली, रेगडी, घोट, गुंडापल्ली, भाडभिडी, अड्याळ, जामगिरी, आमगाव, गिलवार व मार्र्कंडा (कं.) असे एकूण १० धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या १० धान खरेदी केंद्रांवरून २०१७-१८ च्या खरीप हंगामात ३१ मार्चपर्यंत एकूण ६२ हजार ८९ क्विंटल इतकी धान खरेदी करण्यात आली. यापैकी २३ हजार ८३५ क्विंटल धान महामंडळाने गोदामात साठवून ठेवले आहे. गोदामाची पुरेशी व्यवस्था नसल्याने अद्यापही २१ हजार २३७ क्विंटल धान ताडपत्री झाकून केंद्राच्या परिसरात उघड्यावर ठेवण्यात आले आहे.घोट, मक्केपल्ली, रेगडी, गुंडापल्ली, भाडभिडी व आमगाव केंद्रावर खरेदी करण्यात आलेला धान उघड्यावर ठेवण्यात आला आहे. घोट केंद्राच्या परिसरात उघड्यावर ३ हजार ९८५ क्विंटल, मक्केपल्ली येथे ४ हजार ९४ क्विंटल, रेगडी येथे १० हजार ८८६ क्विंटल, गुंडापल्ली येथे १ हजार ६४० क्विंटल, भाडभिडी येथे ५८० क्विंटल धान केंद्राच्या परिसरात उघड्यावर असल्याची माहिती महामंडळाच्या घोट उपप्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.पावसाचा अनियमितपणा व धानपिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात यंदा ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन आले. याचा परिणाम थेट महामंडळाच्या धान खरेदीवर झाला. गतवर्षीच्या खरीप हंगामात घोट उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील १० केंद्रांवर ८० हजार क्विंटलवर धान खरेदी झाली होती. यंदा खरेदी घटली.
२१ हजार क्विंटल धान उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 1:34 AM
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत घोट उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत १० केंद्रांवरून सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात एकूण ६२ हजार ८९ क्विंटलची धान खरेदी करण्यात आली.
ठळक मुद्देउचल करण्यास दिरंगाई : १० केंद्रांवरून ६२ हजार क्विंटलची खरेदी