२१९ गावांत एक गाव-एक गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 11:51 PM2018-09-12T23:51:03+5:302018-09-12T23:51:54+5:30
जिल्ह्यात १० दिवसांच्या गणेशोत्सवाला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. त्यासाठी जिल्हाभरातील ४६५ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सज्ज आहेत. याशिवाय २६९१ ठिकाणी खासगी गणपतींची स्थापना केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात १० दिवसांच्या गणेशोत्सवाला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. त्यासाठी जिल्हाभरातील ४६५ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सज्ज आहेत. याशिवाय २६९१ ठिकाणी खासगी गणपतींची स्थापना केली जाणार आहे. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २१९ गावांमध्ये ‘एक गाव - एक गणपती’ची कल्पना प्रत्यक्षात साकारून एकात्मतेचे दर्शन घडविले जाणार आहे.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा असला तरी गणेशोत्सवादरम्यान कुठेही सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग होण्याचे प्रकार फारसा घडत नाही. त्यामुळे हा उत्सव जिल्ह्याच्या शहरी भागातील नागरिक मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
जिल्ह्यातील ९ पोलीस उपविभागांपैकी गडचिरोली आणि कुरखेडा उपविभागात सर्वाधिक, अनुक्रमे १७९ व १२६ सार्वजनिक मंडळांकडून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. याशिवाय अहेरी उपविभागात ९९, सिरोंचा १२, पेंढरी १५, धानोरा ९, एटापल्ली १०, भामरागड ९ आणि जिमलगट्टा पोलीस उपविभागात ६ अशा एकूण ४६५ सार्वजनिक मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
एक गाव एक गणपती बसविणाऱ्या गावांमध्ये सर्वाधिक कुरखेडा उपविभागातील गावांचा समावेश आहे. या उपविभागात ७३ गावांत प्रत्येकी एकच सार्वजनिक गणेशमूर्तीची स्थापना करून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. याशिवाय गडचिरोली उपविभागात ४८ गावांत, सिरोंचा उपविभागात ४६ गावांत, धानोरा १०, पेंढरी ९, अहेरी १२, एटापल्ली ८ आणि जिमलगट्टा उपविभागात १३ गावांमध्ये एक गणपती राहणार आहे. भामरागड पोलीस उपविभागात मात्र एकाही गावात ही संकल्पना प्रत्यक्षात साकारता आली नाही. एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविणाºया मंडळांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत यंदा घटली आहे.
काही मंडळांकडून आकर्षक रोषणाई केली जाते. त्यासाठी वीज चोरी टाळून त्यामुळे होणारे अपघात घडू नये यासाठी गणेश उत्सवात सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्याचे महावितरण कंपनीने जाहीर केले. मात्र बहुतांश मंडळांनी त्याला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे चोरीची वीज वापरणाºया मंडळांवर वीज कंपनी कारवाई करणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खड्डेमय रस्त्यातून आगमन
गेल्या तीन महिन्यात झालेल्या पावसाने गडचिरोली शहरासह जिल्हाभरातील निकृष्ट रस्त्यांचे पितळ उघडे पाडले आहे. अनेक ठिकाणी डांबरी रस्त्यांवर मुरूमाचा लेप देऊन खड्डे बुजविण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यानंतरच्या पावसाने पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली. आता त्याच परिस्थितीत वाजतगाजत पण खड्डेमय मार्गाने गणरायाला मंडपांमध्ये दाखल व्हावे लागणार आहे.
केवळ १० मंडळांनाच परवानगी
जिल्ह्यातील केवळ १० सार्वजनिक गणेश मंडळांनी कार्यक्रम उत्सवाच्या परवानगीसाठी सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयात आॅफलाईन अर्ज सादर केले व तेवढ्याच मंडळांना परवानगी देण्यात आली. १८ गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज नेले, मात्र त्यापैकी फक्त १० मंडळांनी संपूर्ण दस्तावेजानिशी अर्ज सादर केले.
जिल्ह्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव असल्याने एकाही मंडळाने आॅनलाईन अर्ज सादर केला नाही. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार परवानगीची आॅफलाईन प्रक्रिया सहायक आयुक्त कार्यालयाकडून राबविण्यात आली. गतवर्षी २८ गणेश मंडळांनी रितसर परवानगी घेतली होती. यावर्षी ही संख्या अजून घटून १० वर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.