चामोर्शी (गडचिरोली) : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथील तीन युवक मार्कंडा देव येथे दर्शनासाठी आले असता त्यांना वैनगंगा नदीत आंघोळ करण्याचा मोह आवरता आला नाही. पण पाण्यात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने त्यातील एक युवक वाहत्या धारेला लागून वाहून गेला. शोधमोहिमेनंतर बुधवारी सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला. कृष्णा अजित पुरी (२२ वर्ष) असे मृत युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मार्कंडा हे तीन मित्र देवदर्शन केल्यानंतर नदीच्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरले. जवळच्या नागफणी घाटावर मंगळवारी सायंकाळी चार ते साडेचार वाजतादरम्यान तो पाण्यात पोहत असताना कृष्णाच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ लागला. हे पाहून त्याचे मित्र महेश कोटू (२० वर्ष) आणि सिन्नू पुचमवार (२४ वर्ष) यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले. त्या दोघांना मार्कडा येथील ग्रामस्थांनी पाण्याबाहेर काढले. त्यांना प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय येथे भरती करून कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.
दरम्यान, चामोर्शी पोलिसांनी बुधवारी सकाळपासून वाहून गेलेल्या युवकाचा शोध सुरू केला. उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, तहसीलदार संजय नागटिळक, पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून महसूल विभागाच्या मोटारबोटने कृष्णाचा शोध सुरू झाला. सायंकाळी ४.३० ते ५ वाजतादरम्यान मृतदेह नागफन्याजवळील खोल डोहात सापडल्याची माहिती पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांनी दिली.